पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व मनीषा निश्चल यांचे बहारदार गायन
पुणे: ‘ओंकार स्वरूपा, सद्गुरू समर्था’ भजन असो की, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ हरिपाठ, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ हे पटदीप रागातील भजन असो की, ‘मोगरा फुलला’ भावगीत, ‘मेघा रे मेघा रे’, ‘चिंब पावसानं रान झालं’ अशा अजरामर गीतांच्या अवीट सुरावटींनी गुढी पाडव्याची सुरेल पहाट उजाडली.या विशेष संगीत मैफलीने पुणेकरांना भक्तिरसात न्हाल्याचा आनंद दिला.
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गीत-संगीताने नटलेल्या गायिका मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत ‘सुरेल पहाट’ या सांगीतिक मैफलीचे गेट सेट गो हॉलिडेज व पूना गेस्ट हाऊस यांच्या वतीने आयोजन केले होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारच्या भल्या पहाटे पुणेकरांनी ‘सुरेल पहाट’ची ही पर्वणी अनुभवली. पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व गायिका मनीषा निश्चल यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग व भक्तिसंगीताच्या सुरावटींनी पहाटेचे वातावरण भारावून गेले. पं रघुनंदन पणशीकर यांनी शास्त्रीय रचनांमधून पहाटेच्या रागांचा सुरेल आविष्कार घडवला. मनीषा निश्चल यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायन केले. तर सुरेश वाडकर यांनी ‘ओंकार स्वरुपाने’ ने स्वतःच्या गायनाची सुरुवात केली. पंडित रघुनंदन पणशीकर यांनी ‘सहेला रे’, ‘राम का गुणगान’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ही भजने, तर मनीषा निश्चल यांच्यासोबत ‘हे शाम सुंदर राजसा’ युगुलगीत सादर केले.
मनीषा निश्चल यांच्या ‘मोगरा फुलला’, ‘सूर येती विरून जाती’ ‘मै एक सादि से’, ‘केंव्हा तरी पहाटे’, ‘मोहे नैहर से अब तो’ या अजरामर गीतांना ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली. तर ‘पाहिले न मी तुला’, ‘काळ देहासी’, ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘चप्पा चप्पा’ या गीतांनी पद्मश्री सुरेश वाडकर यांनी मैफल टिपेला नेली. तसेच ‘चिंब पावसानं’ व ‘मेघारे मेघारे’ या सुरेश वाडकर व मनिषा निश्चल यानी गायलेल्या युगुलगीतांना श्रोत्यांनी वन्समोअरसह टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली.
विघ्नेश जोशी यांच्या ओघवत्या निवेदनाने श्रोत्यांच्या आनंदात भर घातली. अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (कीबोर्ड), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज) व विनायक नेटके (तबला), अभिजित भदे (आक्टोपॕड) यांनी वाद्यांवर साथसंगत केली. कार्यक्रमास संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. नववर्षाच्या स्वागताला संगीताचा सुरेल सोहळा लाभल्याने उपस्थितांना अनोखी अनुभूती मिळाली.