पुणे : नाटक हे जीवंतपणाचे लक्षण असून व्यक्तिमत्व विकासाचे मोलाचे साधन आहे. मुलांना विविध विषयांवरील बालनाट्ये दाखविल्यास, बालनाट्याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्यास ती सर्वार्थाने प्रगल्भ होतील, असा प्रतिपादन वंदेमातरम्चे अभ्यासक, बालनाट्य चळवळीतील मार्गदर्शक मिलिंद सबनीस यांनी केले.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात सबनीस आणि रंगकर्मी रवींद्र सातपुते यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्यावेळी सबनीस यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. टिळक रोड वरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस कार्यशाळेतील मुलांनी विविध नाटिका, नाट्यछटांचे सादरीकरण केले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, अश्विनी आरे, पूजा पारखी, राधिका देशपांडे, हर्षदा टिल्लू यांची उपस्थिती होती. नाट्यकार्यशाळेचे संयोजन प्रतीक पारखी यांनी केले होते. कार्यशाळेतील लहान गटातून अबीर वाळिंबे आणि आद्या पटवर्धन तर मोठ्या गटातून श्रावणी गोरे यांची सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या ललित कला केंद्र आणि नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या बारावी नंतरच्या मोठ्यांसाठीच्या अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
रवींद्र सातपुते म्हणाले, नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक मुलगा किंवा मुलगी अभिनेता-अभिनेत्री होईलच असे नाही. मात्र नाट्य कलेचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी भविष्यात चांगला माणूस मात्र नक्की घडू शकतो. चांगला चांगला नट किंवा प्रेक्षक घडण्याची प्रक्रिया नाटकाच्या माध्यमातून घडू शकते.
प्रास्ताविकात नाट्यसंस्कारचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाटक ही कला खूप उपयुक्त आहे. नाट्य प्रशिक्षणाकडे क्रमिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच बघावे. संस्थेच्यावतीने पुण्यातील काही शाळांमध्ये अभ्यासनाट्य चळवळ राबविण्यात येत आहे. कंटाळवाणे विषयही मुलांना नाट्यात्मक पद्धतीने शिकविले जात असल्यामुळे त्याचा मुलांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अभ्यासनाट्य चळवळ भविष्यात संपूर्ण राज्यात राबविण्याचा विचार आहे.
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्य कार्यशाळेचा समारोप
Date: