पुणे: उच्चपदस्थ नेत्यांवर अवमानकारक टीका करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कुणाल कामरावर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल करून त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी हडपसर विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी महिला मोर्चाच्या सरचिटणीस छाया संजीव गदादे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
यावेळी नलिनी मोरे, संगीता पाटील, अश्विनी सूर्यवंशी, रेखा अबनावे, भावना कांबळे, मीरा फडणवीस, जयश्री गदादे व निकिता उबाळे उपस्थित होत्या. योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
छाया गदादे म्हणाल्या, कुणाल कामरा या कलाकाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका करत अपमानास्पद कविता केली आहे. या तथाकथित ‘कॉमेडी शो’ मध्ये त्याने पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अनेक उच्चपदस्थ नेत्यांवरही अवमानकारक वक्तव्ये केली आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. ही प्रगती काही लोकांना खटकत असावी आणि त्यामुळे अशा लोकांकडून योजनाबद्धपणे बदनामीकारक प्रचार केला जात असावा. त्यामुळे याची सखोल चौकशी करून कुणाल कामरावर कठोर कारवाई करावी.
या वेळी पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस स्मिता गायकवाड यांनी देखील कुणाल कामरावर त्वरित कारवाई करून त्याच्या कार्यक्रमासह यूट्यूब चॅनेलवर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली.