पुणे दि. ३० मार्च : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. गुढी उभारून आनंद, समृद्धी आणि परंपरेला अभिवादन करण्याची ही परंपरा आहे. यानिमित्ताने प्रभू श्रीराम आणि माता सीता अयोध्येत परतल्यावर त्यांच्या स्वागतार्थ उभारलेल्या गुढ्यांचे महत्त्व सांगत, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश दिला.
“आज आमच्या घरी, सिल्वर रॉक्स येथे मी आणि माझी भगिनी जेहलम जोशी यांनी गुढी उभारली आहे. मात्र खरी गरज आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद, उत्साह, आशा आणि विकासाची गुढी उभारण्याची,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, समाजातील वाढत्या आत्महत्या आणि हिंसाचाराविरोधातही त्यांनी आवाज उठवला. “तरुणांनी व शेतकऱ्यांनी आत्महत्यांना तिलांजली द्यावी. महिलांवर व गोरगरिबांवर होणारे हिंसाचार थांबवण्याची जबाबदारी शासनावर आहे. सरकारने आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहे ,” अशी ग्वाही त्यांनी दिली
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाजात सकारात्मक विचार रुजवून नवी सुरुवात करण्याचा संदेश देत, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यभरातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.