श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवाला सुरेल बासरीवादनाने प्रारंभ ; उत्सवाचे २६४ वे वर्ष
पुणे :श्रीराम जय राम जयजय राम… च्या निनादात ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराममंदिरात गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण देखील मंदिरात झाले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी हिमांशु बक्षी यांचा बासरीवादन कार्यक्रम झाला. हिमांशु बक्षी यांनी गणेश वंदना बासरीवर सादर केली. त्यानंतर त्यांनी सूरदास यांचा ‘दर्शन दे दो राम ‘ हा अभंग सुरेल वादनातून सादर केला. ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव’ आणि ‘कौसल्येचा राम’ या गीतांवर बासरी वादनाने वातावरण प्रसन्न झाले. यानंतर हिमांशू बक्षी यांचे गुरु पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी राग अहिर भैरव आणि पहाडी रागात दोन बंदिश सादर केल्या. श्रीकांत भावे यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली.
भरत तुळशीबागवाले म्हणाले, उत्सवादरम्यान दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दररोज सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांचे श्रीमत् रामायण प्रवचन होणार आहे. तर, सोमवार, दि. ३१ मार्च रोजी मंजिरी आलेगांवकर यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी दीप्ती कुलकर्णी यांचा सोलो हार्मोनियम वादन कार्यक्रम, बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

