पुणे (२९ मार्च) : ‘१९६२मध्ये चीनशी झालेल्या युद्धात तत्कालीन राजकीय नेतृत्वाने सैन्यदलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा दिली नव्हती. मात्र, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये तत्कालीन राजकीय नेतृत्वाने सेनाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे मोठे यश मिळू शकले’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व सामरिक शास्त्र विषयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत परांजपे यांनी केले
भारत व पाकिस्तान दरम्यान १९६५मध्ये झालेल्या युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माजी सैनिक व अधिकाऱ्यांची ऑलिव्ह ग्रीन संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाने या युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन विभागाच्या फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट आवारात शनिवारी आयोजित केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. परांजपे बोलत होते.
‘प्रत्यक्ष सरंक्षण दलांमध्ये काम करणारे, युद्धात सहभाग घेतलेले अधिकारी-सैनिक आणि सैद्धांतिक मांडणी करणारे सामरिक तज्ज्ञ यांचा समन्वय सामरिक शास्त्रांचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संरक्षणविषयक तज्ज्ञ डॉ. श्रीकांत परांजपे यांनी शनिवारी केले.
१९६५च्या युद्धात पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे वीरचक्रविजेते एअर मार्शल प्रकाश पिंगळे (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी युद्धात सहभागी विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) उपस्थित होते. या दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष युद्धातील अनुभव या वेळी सर्वांना सांगितले. भारतीय हवाईदलाची या युद्धाच्या यशातील भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
या प्रसंगी ऑलिव्ह ग्रीनचे संचालक लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य अॅड. इशानी जोशी, संरक्षणविषयक तज्ज्ञ काशीनाथ देवधर आदी उपस्थित होते. संस्थेचे जयप्रकाश भट यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. तांबट यांनी आभार मानले.
लष्करी इतिहासविषयक तज्ज्ञ नितीन शास्त्री यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांना सर्व छायाचित्रे आणि युद्धातील विविध प्रसंगांची माहिती दिली.
सैन्यदलांना निर्णय स्वातंत्र्यामुळे १९६५च्या युद्धात यश – डॉ. परांजपे
Date: