अवंतिका मालिकेतील कलाकारांचा २० वर्षांनंतर पुनर्मिलन सोहळा
पुणे, दिनांक २९ मार्च २०२५ – “अवंतिका या मालिकेतील शीर्षक भूमिकेमुळे मी अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही अधिक मोकळी होत गेले. मी अंतर्मुख होते, ती जरा बदलले आणि अधिक धीट, खंबीर झाले,” असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अवंतिका या सन २००० च्या दशकात दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होणाऱ्या मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेचा कळस गाठणारी व मराठी रसिक मनांवर अक्षरश: अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणून झी मराठी वरील अस्मिता चित्र निर्मित ‘अवंतिका’ या मालिकेची ओळख आहे. मार्च २००५ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या घटनेस आता २० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील आशुतोष देशपांडे व प्रसाद कामत यांच्या पुढाकाराने व पीवायसी हिंदू जिमखानाच्या सहकार्याने सदर मालिकेत काम केलेल्या प्रमुख कलाकारांना एकत्र आणून मालिकेसंबंधी आठवणी जागविणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पीवायसी हिंदू जिमखाना येथे हा पुनर्मिलन सोहळा रंगला आणि सारे वातावरण स्मृतिकातर झाले.
या सोहळयाला मृणाल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, सुलेखा तळवलकर, सारिका निलाटकर, रोहिणी निनावे, स्वारी राजे, प्रसाद कामत, दीपा लागू, शुभांगी दामले, वंदना वाकनीस, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे, राहुल मेहेंदळे, राधिका काकतकर, अशोक शिंदे, बालकलाकार सार्थक केतकर, श्रीराम पेंडसे, आशुतोष देशपांडे, अनुराधा जोशी आदी पडद्यावरील व पडद्यामागील कलाकार उपस्थित होते. आर जे श्रृती यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मृणाल कुलकर्णी अवंतिका मालिकेच्या आठवणी जागवताना म्हणाल्या, “आपली फसवणूक आणि प्रतारणा झाल्याचे लक्षात आल्यावर आणि त्या धक्क्यातून बाहेर आल्यावर अवंतिका जेव्हा घर सोडण्याचा निर्णय घेते, तो भाग मला जवळचा वाटतो. तो माझा आवडता सीन आहे. या प्रसंगात अवंतिका सेल्फ मेड होते. ती धीट, खंबीर, ठामपणे निर्णय घेणारी होते. या मालिकेतील कुठलीही व्यक्तिरेखा कृष्णधवल रंगात न रंगवता, पटकथाकार रोहिणी निनावे यांनी ग्रे रंगछटेत रंगवल्या होत्या. त्यामुळे कुठल्याच व्यक्तिरेखेला नकारात्मक किंवा खलनायकी छटा नव्हती. त्या काळात मी हिंदी मालिकांमध्ये व्यग्र होते. पण स्मिताताई आणि संजय सूरकर यांनी मला मराठी मालिकेत काम करण्यासाठी तयार केले. ही मालिका लोकप्रिय ठरली, कारण यामध्ये अतिरंजित काहीच नव्हते. सगळे वास्तववादी होते.”
संदीप कुलकर्णी म्हणाले, “या मालिकेच्या निमित्ताने माझी स्मिताताईंशी प्रथमच भेट झाली. मालिकेतील दीपाताई लागू (आईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री) यांच्यासोबतचे प्रसंग मला आजही आठवतात, इतके ते प्रभावी आणि भावणारे होते. या मालिकेने मला ओळख दिली.”
सुबोध भावे म्हणाले, “मला सेटवरचा पहिला दिवस लख्ख आठवतो. मी नवीन होतो. मालिकेतील अनेक ज्येष्ठ कलाकारांचा सहवास, ते वातावरण हे सारे खूप शिकवणारे होते.”
पुष्कर श्रोत्री यांनी मालिकेदरम्यानचे काही किस्से सांगितले. मी स्मिताताईचा प्रचंड लाडका होतो आणि मी आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायचो असे ते म्हणाले.
सुलेखा तळवलकर म्हणाल्या, “लोक आपल्या मालिकेतील व्यक्तिरेखांसोबत भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात, याचे भान या मालिकेच्या निमित्ताने आले. मालिकेतील प्रत्येक ट्रॅक स्वतंत्र असूनही, त्याचे धागे मुख्य कथानकात एकजीव झाले होते.” अभिनेत्री सारिका निलाटकर म्हणाल्या, “माझी व्यक्तिरेखा विवाहबाह्य संबंध ठेवणारी होती, पण ती खलनायिका नव्हती. कारण प्रत्येक व्यक्तिरेखेला तर्कसंगत असा न्याय मालिकेत दिला होता.”
पटकथाकार रोहिणी निनावे म्हणाल्या, “स्मिताने मला प्रथम स्नेहलता दसनूरकरांची कथा दिली. ती मूळ कथा १५ पानांची होती. पण मालिकेसाठी त्यात भर घालणे गरजेचे होते. अनेक व्यक्तिरेखा नव्याने निर्माण कराव्या लागणार होत्या. या सर्व प्रक्रियेत स्मिताने माझ्यावर विश्वास ठेवला. आमचे छान सूर जुळले आणि कधीही कुठलाही वाद झाला नाही.”
संवादलेखक स्वाती राजे यांनी पत्रकारितेची पार्श्वभूमी उपकारक ठरल्याचा उल्लेख केला. “कथानकामध्ये नंतर अनेक नवी पात्रे येत गेली. नवे ट्रॅक आले. मला लेखनाची मोकळीक दिल्याने अधिक चांगले काम करता आले.”
ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू यांनी या मालिकेमुळे माझा अनेक कलाकारांशी परिचय झाला असे सांगितले. मराठीमध्ये मी असे काम करू शकेन की नाही, याविषयी मी साशंक होते, पण सर्वांनी मला विश्वास दिला आणि त्या सगळ्यांविषयी मला कृतज्ञता वाटते, असे त्यांनी नमूद केले. अवंतिका मालिकेतील कामाची विचारणा हे स्वप्नवत होते. मी नागपूरहून येऊन जाऊन काम केले, अशी आठवण अनुराधा जोशी यांनी सांगितली.
यावेळी मालिकेचे शीर्षकगीत पुन्हा निनादले. याविषयी बोलताना विभावरी आपटे म्हणाल्या, “अवंतिका मालिकेइतकेच त्याचे शीर्षकगीतही लोकप्रिय झाले होते. हे गीत सौमित्र यांनी लिहिले होते तर नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केले होते, मी नवीन असूनही हे शीर्षकगीत गाण्याची संधी संगीतकार नरेंद्र भिडे यांनी मला दिली. माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे माझ्या कारकिर्दीतले पहिले शीर्षकगीत ठरले.” आपटे यांनी शीर्षकगीताचा काही अंश यावेळी उपस्थितांसमोर सादर केला.

