पुणे- लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, PVSM, AVSM, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ , दक्षिणी कमांड , यांनी नुकतीच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (AFMC)ला भेट दिली . त्यावेळी त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांच्या संशोधन, नवोन्मेष व वैज्ञानिक कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या अनुसंधान या प्रसिद्धी दालनाचे उदघाटन केले. त्यांनी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय(CME) इथे भेट दिली व नवोन्मेष प्रेरित अभियांत्रिकी प्रकल्प व आधुनिक प्रशिक्षण सुविधांचे कौतुक केले. तेथील भू- माहिती विज्ञानातील, सर्वेक्षण सॉफ्टवेअर, ड्रोन प्रशिक्षण यातील महत्वाच्या सुधारणांचा त्यांनी आढावा घेतला. नवोन्मेषला प्रोत्साहन देण्याच्या संस्थेच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली.
ते म्हणाले, पुणे दक्षिणी कमांडचे मुख्यालय , भारताच्या लष्करी कारकिर्दीला आकार देणाऱ्या अनेक प्रतिष्ठित संस्थांचे माहेरघर आहे. यात राष्ट्रीय संरक्षण अकादमी ( NDA), लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय(CME), सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (AFMC), लष्करी गुप्तसूचना प्रशिक्षण केंद्र व डेपो (MINTSD) , लष्करी शारीरिक शिक्षण संस्था (AIPT), व मुंबई अभियांत्रिकी समूह (BEG) इत्यादींचा समावेश आहे. या सर्व संस्था उत्कृष्टतेचे आधारस्तंभ असून नेतृत्वगुणांना, नवोन्मेषाला व संरक्षण क्षेत्रातील उच्चकोटीच्या संशोधनाला प्रोत्साहन देत असतात.
परंपरा, बुद्धिचातुर्य आणि देशभक्तीच्या गुणांचा एकमेवाद्वितीय संगम असलेल्या या पुणे शहरात या सर्व संस्थांचा यथोचित सन्मान व आदराची भावना आहे. सेवारत व निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा मोठा समुदाय सामावून घेणारे पुणेकर या सर्व संस्थांशी भावनिक व ऐतिहासिक जवळीक बाळगून असतात. या संस्थांनी देशाच्या संरक्षण व चारित्र्यवर्धनासाठी दिलेले योगदान या शहराला पूर्ण ज्ञात आहे. पुण्याला बरेचदा ‘लष्करी उत्कृष्टतेचे माहेरघर’ असे संबोधले जाते. या संस्था केवळ भारतीय सैन्यदलांना व्यावसायिक प्रशिक्षणच देतात असे नाही तर या शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक महावस्त्राला एक वेगळा साज चढवतात. या शहरात राहणारे अनेक सेवारत व निवृत्त सैन्याधिकारी या संस्थांचे माजी विद्यार्थी असतात आणि तेच या शहरातील तरुण पिढीला स्फूर्ती देतात तसेच पुण्याच्या समाजजीवनात देशभक्तीची मूल्ये बिंबवण्याचे कार्यही करतात.
देशहिताचे रक्षण करण्यास प्राथमिकता देणारी दक्षिणी कमांड, धोरणात्मक दूरदृष्टी दर्शवत सतत होणाऱ्या बदलांशी जुळवून घेत युद्धतत्परतेसाठी वचनबद्धता दाखवते. दक्षिणी कमांड पुण्यातील नागरी जीवनाशी सहकार्य करत आधुनिकतेची कास धरणारी , क्षमतावर्धनासाठी सज्ज व तत्पर असून भविष्यवेधी तसेच कर्तव्यकठोर आहे.