नवी दिल्ली-
नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त, आकाशवाणीच्या आराधना युट्युब चॅनेलवर 30 मार्च ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत विशेष कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांना संपूर्ण उत्सवकाळात एक भक्तिमय आणि आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.
नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन, चॅनेलवर दररोज सकाळी 8:00 ते रात्री 8:00 या वेळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शक्ती आराधना हा संगीतमय भक्तिपूर्ण कार्यक्रम दररोज सकाळी 8:30 ते 8:40 या वेळेत प्रसारित केला जाईल, ज्यात दिव्य स्तोत्रे आणि भक्तिगीते सादर केली जातील.
या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवरात्री भजन, ज्यामध्ये प्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा, नरिंदर चंचल, जगजीत सिंग, हरी ओम शरण, महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजातील भक्तिगीते ऐकता येतील. हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 6:00 ते 7:00 या वेळेत प्रसारित केला जाणार आहे.
श्रोत्यांच्या भक्तिभावाला अधिक समृद्ध करण्यासाठी, ‘देवी माँ के अनेक स्वरूप’ ही विशेष कथा मालिका सादर केली जाणार आहे, जी नवरात्रीच्या विविध प्रेरणादायी कथा उलगडणार आहे. हा कार्यक्रम दररोज सकाळी 9:00 ते 9:30 या वेळेत प्रसारित केला जाईल. तसेच, भारतभरातील शक्तीपीठांची वैशिष्ट्ये सादर केली जातील. ज्यामुळे देवी दुर्गेला समर्पित या पवित्र स्थळांची ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती श्रोत्यांना मिळेल.
नवरात्री उत्सवाचा समारोप भव्य राम जन्मोत्सव कार्यक्रमाने होईल, जो थेट श्रीराम जन्मभूमी मंदिर, अयोध्या येथून प्रसारित केला जाईल. हे विशेष प्रसारण 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:45 ते 12:15 या वेळेत होईल, ज्यामुळे संपूर्ण देशभरातील श्रोते या पवित्र सोहळ्याचा लाभ घेऊ शकतील.
श्रोते आकाशवाणीच्या आराधना युट्युब चॅनेलला ट्यून इन करून नवरात्रीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात आणि श्रद्धेने हा पवित्र सण साजरा करू शकतात.