नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी आज संवाद साधला. या कसोटीच्या काळात म्यानमारबरोबर भारत एक जवळचा मित्र व शेजारधर्माच्या भावनेने उभा असून मदतीसाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. या आपत्तीच्या निवारणासाठी भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरु केले असून त्यातून म्यानमारमधील भूकंपाने प्रभावित क्षेत्रांमध्ये त्वरित मदत पोचवण्याचे काम सुरु झाले आहे.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे,
“म्यानमारचे सिनियर जनरल महामहिम मिन ओंग ह्लाइंग यांच्याशी मी संवाद साधला. विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल मी संवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत म्यानमारच्या जनतेसोबत एक जवळचा मित्र आणि शेजारी या नात्याने बंधुभावाने उभा आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ #OperationBrahma अंतर्गत भूकंप प्रभावित क्षेत्रात आपत्ती निवारण सामुग्री, मानवतापूर्ण मदत, तसेच शोध व बचाव पथके तातडीने पाठवली जात आहेत.”