श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन ; व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम
पुणे : श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दि. ३० मार्च ते शनिवार, दि. १२ एप्रिल २०२५ दरम्यान जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. रविवार, दिनांक ३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळाचे भजन आणि आरती होणार आहे.
दिनांक ३० मार्च ते ११ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. दिलीप महाजन, डॉ. राजेंद्र राऊत, डॉ. वर्षा तोडमल, काशिनाथ देवधर, उमेश झिरपे, विनिता तेलंग, डॉ. उदय निरगुडकर, डॉ. सुनील साठे, ह.भ.प.किसन चौधरी, सुनील तांबे, योगी निरंजननाथ, डॉ. अजित आपटे, ह.भ.प.डॉ. चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे आदी मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
तसेच, दररोज रात्री ८ वाजता संगीत सभा अंतर्गत प्रसिद्ध गायक कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये पं. कल्याण अपार, अवंतिका-निकिता बहिरट, विदुषी मंजुषा पाटील, पं. शौनक अभिषेकी, उमेश साळुंके, विदुषी कलापिनी कोमकली, पं. रघुनाथ खंडाळकर, शमिका भिडे, शाश्वती चव्हाण, नितीन मोरे, श्रीधर फडके, पद्मश्री पं. विजय घाटे आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सद््गुरु श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर शनिवार, दि.१२ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.