नवी दिल्ली-
संरक्षण मंत्रालयाने आज (28;03;2025) 156 हलक्या वजनाचे लढाऊ ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर (एलसीएच) पुरवण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सोबत दोन करार केले. यावेळी कर वगळता 62,700 कोटी रुपयांचा व्यवहार करण्याचा करार केला. तसेच प्रशिक्षण आणि इतर संबंधित उपकरणे या करारानुसार देण्यात येणार आहेत. पहिला करार भारतीय हवाई दलाला (आयएएफ) 66 एलसीएच पुरवण्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला 90 एलसीएच पुरवण्यासाठी करण्यात आला आहे.

या हेलिकॉप्टरचा पुरवठा तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल आणि पुढील पाच वर्षांत मागणी पूर्ण केली जाईल. या करारांमुळे जास्त उंचीवर सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढेल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर काम करण्याची क्षमता आहे.
संरक्षण मंत्रालयाने आयएएफ आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एका फ्लाइट रिफ्युएलिंग एअरक्राफ्ट (एफआरए) च्या ‘वेट लीजिंगसाठी मेट्रिया मॅनेजमेंट’ बरोबर करार केला आहे. मेट्रिया सहा महिन्यांत एफआरए (केसी135 एअरक्राफ्ट) प्रदान करणार आहे. अशा प्रकारे आयएएफने वेट भाडेतत्वावर घेतलेले हे पहिले एफआरए आहे.
या तीन करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर 2024-25 दरम्यान संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केलेल्या एकूण करारांची संख्या 193 झाली आहे. त्यांचे एकूण करार मूल्य 2,09,050 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंतचे हे मूल्य सर्वाधिक आहे. इतकेच नाही तर, मागील सर्वोच्च आकड्याच्या जवळजवळ दुप्पट आहे. यापैकी, देशांतर्गत उद्योगांबरोबर केलेले करार 177 (92%) आहेत ज्यांचे करार मूल्य 1,68,922 कोटी रुपये (81%) आहे.