पुणे, दि. २९ मार्च २०२५: महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-हिंजवडी-१ अतिउच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. २८) रात्री ७ च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे सुमारे १०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली. भारव्यवस्थापनातून ही तूट भरून काढत महापारेषण व महावितरणकडून पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र कमाल मागणीच्या काळात सुमारे ४० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर पुढील २४ तासांमध्ये हिंजवडी फेज-२, मेगापोलीस, माण व मारूंजी परिसरात चक्राकार पद्धतीने आवश्यकतेनुसार भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ते टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.
याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही पिरंगूट-हिंजवडी-१ अतिउच्चदाबाच्या भूमिगत वीजवाहिनीमध्ये काल रात्री बिघाड झाला. महापारेषणच्या पाहणीमध्ये हिंजवडी येथे हा प्रकार घडल्याचे दिसून आले. मात्र बिघाडाचे कारण कळू शकले नाही. या वीजवाहिनीद्वारे १०० मेगावॅट विजेचे वहन केले जाते. बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून पर्यायी वीजपुरवठाद्वारे भारव्यवस्थापन करून ही १०० मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यात आली आहे.
महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-हिंजवडी १ वीजवाहिनीद्वारे प्रामुख्याने हिंजवडी फेज दोन, मेगापोलीसमधील २०० आयटी उद्योगांसह माण व मारूंजी परिसरातील सुमारे १५ हजार ग्राहकांनी वीजपुरवठा केला जातो. या परिसरासाठी ४० मेगावॅट विजेची गरज आहे. तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे विजेच्या भारव्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे. यात कमाल मागणीच्या कालावधीत ४० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर हिंजवडी फेज दोन, मेगापोलीस, माण व मारूंजी परिसरात पुढील २४ तासांमध्ये आवश्यकतेनुसार चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित उद्योग व वीजग्राहकांना समाज माध्यमे व मोबाईल एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे.
दरम्यान, महापारेषणकडून बिघाड झालेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. २९) सकाळी सुरु करण्यात आले. यामध्ये खोदकाम करून वीजवाहिनीची पाहणी करण्यात येणार आहे व आवश्यकतेनुसार जाईंट देऊन दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी १२ ते २४ तासांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती देण्यात आली.