पुणे : देशी गाईंची उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे त्यांचे संगोपन करणे व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही, अशा गाईंना गोशाळेत ठेवण्यात येते. गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गोशाळेतील गाईंना प्रतिदिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी शासनाने गोवंश परिपोषण ही योजना राबवली आहे.
या अंतर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गाईंसाठी, २५ कोटी ४५ लाख ६६ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या, अशी माहिती गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, संतकुमार गुप्ता, मनीष वर्मा, परेश शाह, दीपक भगत, सदस्य सचिव डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेखर मुंदडा म्हणाले, गोवंश परिपोषण योजनेचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आहे. गोशाळांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या गाईंना परिपोषणासाठी अनुदान देण्यात येत आहे. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून त्यामुळे ग्रामीण विकास गतिमान होण्यास मदत होणार आहे.