‘आयुष्याची कॉमेडी’ करण्याचा इशारा दिला सुधीर मुनगंटीवार यांनी
मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकात्मक गाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. यामुळे कामराला तूर्त अभय मिळाले आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी कुणाल कामरावर टीकेची झोड उठवत त्याच्या ‘आयुष्याची कॉमेडी’ करण्याचा इशारा दिला आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामराविरोधात समन्स बजावला आहे. यामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.
या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने त्याच्या याचिकेवर शुक्रवारी तातडीने सुनावणी करत त्याला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले. कोर्टाच्या या निर्णयामुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार तूर्त दूर झाली आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही या प्रकरणी कुणाल कामरावर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना कुणाल कामराच्या आयुष्याची कॉमेडी करण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी त्याला पकडावे व त्याच्या आयुष्याची कॉमेडी करावी. त्याला खूप मस्ती आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू शकत नाही. हा स्वैराचार आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. केतकी चितळेने कुणाचेही नाव घेतले नव्हते. त्यानंतरही तिला 30 दिवस तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी आम्हाला शिकवण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणालेत.

