मुंबई-भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल केलेला हक्कभंग स्वीकारण्यात आला आहे. या प्रकरणी आजच या दोघांनाही नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामरा व अंधारे या दोघांच्याही अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत कुणाल कामरा व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांचा हक्कभंग स्वीकारला आहे. सभापती राम शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. ही समिती कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांना कदाचित आजच खुलासा करण्यासंबंधीची नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधारे व कामरा या दोघांच्याही अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेने कामरा याच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कामराचे गाणे म्हणून शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला होता.