पुणे, दि. २८ मार्च २०२५: पुणे परिमंडलामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांकडे अद्यापही ८२ कोटी ९७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. त्यामुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९), रविवारी (दि. ३०) व सोमवारी (दि. ३१) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.
वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरले नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत गेल्या २७ दिवसांमध्ये पुणे परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ३३ हजार ३२९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात पुणे शहरातील १३ हजार २२२, पिंपरी चिंचवड शहरातील १० हजार ८२० आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांतील ९ हजार २८७ थकबाकीदारांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे पुणे शहरात ३६ कोटी ८६ लाख पिंपरी चिंचवड शहरात १८ कोटी ६५ लाख आणि आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांत २७ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९), रविवारी (दि. ३०) व सोमवारी (दि. ३१) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांच्या माहितीसाठी –
१) देयकाचा तत्पर भरणा सवलत (प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंट) –वीजदेयकाच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास १ टक्के सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्टपेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते.
२) ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के सवलत – क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेट, मोबाइल बँकींगद्वारे वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.
३) थकबाकीवरील व्याज – वीज देयकांच्या देय तारखेपासून असलेली थकबाकी ६० ते ९० दिवसांदरम्यान भरल्यास – १२ टक्के व्याज आणि वीज देयकाची थकबाकी ९० दिवसांनंतर भरल्यास – १५ टक्के
४) विलंब शुल्क आकारणी – संबंधित महिन्याचे वीज देयक देय तारखेच्या मुदतीत न भरल्यास १.२५ टक्के विलंब शुल्क आकारणी केली जाते.