पुणे-सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित सणसवाडी (जि. पुणे ) येथील “लावणी प्रशिक्षण शिबीरा”चा समारोप संपन्न झाला.संचालिका रेश्मा परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांचे लावणी प्रशिक्षण शिबीर सणसवाडी (जि. पुणे) येथे सुरू होते.

नवोदित लोककलावंतांना लोककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, म्हणून शासन दरवर्षी विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करते. त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात या लावणी प्रशिक्षण शिबीराचा वाखण्याजोगा समारोप झाला.
दहा दिवसाच्या शिबिरात नृत्य शिकलेल्या विदयार्थ्यांनी सुंदर अशा लावण्या सादर केल्या. परंपरेनुसार गण,मुजरा,गवळण (श्रुगारिक ), आम्ही काशीचे बाम्हण ही बैठकीची लावणी,पाहुणीया चंदवदन,वाटल होत तुम्ही याल,आशुक मासुक नीर नशिकची, राया मला सोडून जाऊ नका,बाई ग बाई -(छक्कड), मी तुमची मैना तुम्ही माझे राघु,पाया मघ्ये चाळ बांधुनी (छक्कड), पारंपारिक झिल, अशा विविध लावणी कला प्रकार यावेळी सादर केला.याला सभागृहातील रसिकांनी भरभरून दाद दिली.
विशेषतः गावचा पाटील आणि एक लावणी नृत्यांगणा यांच्यातील झगडा हा लावणीचा कला प्रकार नम्रता अंधारे आणि उमा काळे यांनी अंत्यत उत्कृष्ट अभिनयातून सादर केला.आणि रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. स्वतः हा रेश्मा परितेकर यांनी रंगमंचा ताबा घेवून आपल्या लोककलेची झलक दाखविली.
सुप्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर,नटरंग फेम ढोलकीपट्टू कृष्णा मुसळे यांची यावेळी चांगलीच जुगलीबंदीची झलक ऐकायला मिळाली. यांना विठ्ठल या ढोलकीपट्टूने साथ दिली होती.या समारोपाला लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वानाथ शिंदे, प्रभाकर ओव्हाळ, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड,सहयोगी प्राध्यापक डॉ. नवनाथ शिंदे, सणसवाडी कला केंद्राच्या संचालिका सुरेखा पवार, अप्सरा जळगावकर, उपस्थितीत होते. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित विदयार्थ्यांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिले जाणारे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले.
