मुंबई-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एक नवा खुलासा बाहेर आला आहे. त्यानुसार, दिशा आपल्या वडिलांच्या अफेअरमुळे तणावात होती. संबंधितांना पैसे देऊन ती पुरती थकली होती. यामुळे आलेल्या आर्थिक वैफल्यातून तिने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले, असे मालवणी पोलिसांच्या यापूर्वीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यातच आता मालवणी पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेल्या आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये वरील नवी माहिती उजेडात आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दिशा सालियान वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसे देऊन थकली होती. कष्टाने कमावलेला पैसा नको त्या गोष्टींवर खर्च होत असल्यामुळे ती खचली होती. तिने आपल्या मित्रांशीही ही गोष्ट बोलून दाखवली होती. याच आर्थिक तणावातून नंतर तिने आत्महत्या केली. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालात दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या अहवालात डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.
दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी तपास करुन एक अहवाल सादर केला होता. त्यात दिशाचे काही प्रोजेक्ट्स अयशस्वी झाले होते, मित्रांशी खटके उडाले होते, अशा कारणांचा उल्लेख होता. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दिशाच्या वडिलांनीच लेकीने कष्टाने कमावलेले पैसे आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यावर उधळल्याचेही यात नमूद आहे. दिशाने ही गोष्ट तिच्या काही मैत्रिणींना आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही सांगितली होती. 2 जून 20202 रोजी दिशाने यासंबंधी आपल्या वडिलांना जाब विचारला आणि त्यानंतर ती तिचा होणारा नवरा रोहन रॉय याच्या जनकल्याण नगरमधील फ्लॅटवर राहायला गेली.
दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यानंतर त्यांनी दिशाने आत्महत्या केल्याचा अंतिम निष्कर्ष काढला. 4 फेब्रुवारी 2021 रोजी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. सतीश सालियन यांनी आता पुन्हा याचिका दाखल करून काही बड्या असामींवर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर 3 दिवसांनी तिचे शवविच्छेदन झाले होते. त्यात दिशाच्या हात, पाय व छातीवर जखमा झाल्याचा उल्लेख आहे. विशेषतः तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद आहे. एवढेच नाही तर दिशाच्या नाक व तोंडातून रक्त येत असल्याचेही या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. पण तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याची नोंद त्यामध्ये नाही.
दुसरीकडे, दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या वकिलांसह नुकतीच मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या कथित हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा त्यांचा आरोप आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात. इतरही अनेक गोष्टी आमच्या तक्रारीत नमूद आहेत. या गोष्टी संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहेत.