मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेसेनेत अजूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिवसैनिकांनी कुणालच्या मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यावर ‘अॅक्शनची रिअॅक्शन येणारच’ असे सांगून शिंदे यांनी या कृतीचे समर्थन केले होते. आता त्यांच्या पक्षाचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी तर थेट कायदा हाती घेऊन कुणालला ‘थर्ड डिग्री’ देण्याची धमकीच दिली आहे. कायद्याचे राज्य असताना कायदेशीर कारवाई ऐवजी ‘थर्ड डिग्री’ ची म्हणजे बेदम मारहाणीची भाषा करून मोगलाई च्या राज्याची आठवण शंभूराज देसाई यांनी करून दिल्याची टीका आता होऊ लागली आहे.
शंभूराज म्हणालेे, ‘कुणालने मर्यादा ओलांडली आहे. आता पाणी डोक्यावरून वाहत असून त्याला प्रसाद देण्याची वेळ आली आहे. शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओत प्रसाद दिला. तरीही आता तो मुद्दाम रोज एक नवा व्हिडिओ पोस्ट करत आहे. त्यामुळे आता तो कोणत्याही बिळात लपला तरी त्याला तेथून बाहेर काढून रस्त्यावर पटकले जाईल. त्याला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री दिली जाईल,’ असा इशारा देसाई यांनी दिला.शिंदे यांची बदनामी केल्याच्या तक्रारीवरून कुणाल कामरावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन वेळा त्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. पण सध्या तो तामिळनाडूतील मूळ गावी गेलेला आहे. कुणालच्या वकिलांनी २ एप्रिलपर्यंत हजर राहण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. पण ती फेटाळण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी चौकशीस हजर राहावे, असे आदेश पोलिसांनी बजावले आहेत. त्यामुळे आता कुणाल हजर होतो की कोर्टात जाऊन दिलासा मिळवतो, याकडे लक्ष लागले.
कुणालचे समर्थक मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलेत. गेल्या दोन दिवसांत देश-विदेशातून त्याच्या खात्यात ४ कोटी सात लाख ८० हजार रुपये क्राऊड फंडिंग जमा झालाय. व्यवस्थेविरोधात भाष्य करण्याचे धाडस दाखवणाऱ्या कुणालला नेत्यांनी दाखल केलेल्या कायदेशीर कारवाईत लढण्यासाठी मदत म्हणून ही रक्कम पाठवली जात असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षातील काही नेते पैसे देऊन कुणालला सत्ताधाऱ्यांविरोधात बोलायला लावत असल्याचा आरोप होतो. पण ‘तुम्ही माझे खाते तपासू शकता,’ असे सांगून कुणालने आरोपाचे खंडन केले.
शिंदेसेनेचे स्थानिक नेते राहुल कनाल यांनी खार पोलिसात तक्रार देऊन कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला टेरर फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला आहे. राहुल कनाल म्हणाले की, ‘कुणाल पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्व मोठ्या नेत्यांवर बोलतो. ‘हम होंगे कामयाब’ असे देशाचे गाणे आहे. या गाण्याला ‘हम होंगे कंगाल’ असे विडंबन त्याने केले आहे. कॅनडा, यूएसए आणि पाकिस्तानमधून त्याला ४०० डॉलर पाठवण्यात आले आहेत, त्याची चौकशी करून कारवाई करा. कुणालचे यूट्यूब अकाउंट बंद करा,’ अशी मागणीही त्यांनी केली.

