पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये सबंध महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी राजीनामा दिला असून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारली आहेत.
प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आता नवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये नव्याने पक्ष संघटना बांधतील आणि संघटनात्मक काही फेरबल करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पुन्हा एकदा फिल्डिंग सुरू झाली आहे. माजी आमदार अनंतराव विठ्ठलराव गाडगीळ,अविनाश बागवे, संजय बालगुडे, या नावांची चर्चा असली तरी सध्याचे प्रभारी अरविंद शिंदे यांनाच अध्यक्ष राहू द्यावे मात्र माजी मंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी,अभय छाजेड आणि शिंदे यांच्यात तत्पूर्वी समन्वयाची बैठक घेऊन एकोपा साधावा असे नेत्यांना वाटू लागले असल्याचे काहीजण सांगत आहेत. असंख्य वेळा आमदारकी डावलल्याने पक्षापासून दूर गेलेले आबा बागुल यांच्याबाबत देखील नेते विचार करू शकतात असेही काहींचे म्हणणे आहे.काँग्रेस कडे मातब्बर अनुभवी नेते असले तरी त्यांच्यात आपसातच प्रचंड दरी निर्माण झाल्याने शहरातील काँग्रेसची दुरावस्था झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.या सर्वांना एकत्र आणून पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी अनंतराव गाडगीळ यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता काही जाणकार सूत्रांनी वर्तविली आहे.ज्यामुळे अनंतराव गाडगीळ यांच्यासारखा ब्राम्हण चेहरा देखील शहराच्या राजकारणात सक्रीय होऊन पक्षाला उभारी मिळू शकेल अशी आशा काही समीक्षकांना वाटते आहे. काहींनी रोहित टिळकांचे नाव देखील सुचवले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान सपकाळ यांच्याकडे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला.यानंतर आता पुणे शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष बदलाचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील विविध गटांकडून शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. या वेगवेगळ्या गटांकडून पुणे कॉग्रेस शहराध्यक्ष पदासाठीचे वेगवेगळी नावं चर्चेत आहे. पुणे शहरातील काँग्रेसचा शहराध्यक्ष बदलावा यासाठी गेल्या काही काळापासून काँग्रेसमधील काही गट कार्यरत आहेत. सुरुवातीला लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदलावा, यासाठी पुण्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते.शहराध्यक्ष बदलाबाबत मागील वेळेस एका कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली होती.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अविनाश बागवे , अरविंद शिंदे हे उत्तम चेहरा असून त्यांना महापालिकेत विविध पदांवरती काम केलं असून त्यांना महापालिकेची चांगली जाण आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्यासारखा युवा आणि आक्रमक चेहरा दिल्यास काँग्रेसला फायदा होईल, अशी भूमिका देखील मांडण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान अनंतराव गाडगीळ हे दिले तरी शहराध्यक्ष पद स्वीकारतील काय? याबाबत अनेकांना शंका वाटते आहे.