वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल मध्ये नोंद
पुणे : मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग ५१ मराठी पारंपारिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे. सलग ४ तास ४५ मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला.
कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल च्या प्रतिनिधी नीता दोंदे टिपणीस यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन पुष्पा चौधरी यांचा सन्मान केला. यावेळी सिद्धेश्वर झाडबुके, अनिरुद्ध हळंदे, संतोष राऊत हे समीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी लीला गांधी, सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर, श्वेता शिंदे, जयमाला इनामदार, प्राजक्ता गायकवाड, शुभदा नाईक, डॉ. शशी डोईफोडे , अंकुश मांडेकर, प्रदीप कोथमीरे, तृप्ती देसाई,शशिकला मेंगडे, वृषाली चौधरी, सायली वांजळे, दिपाली धुमाळ.
तसेच वॅलेंटीना कंपनीचे आबासाहेब चोरघे, संतोष बांदल, संदीप पवार, सुषमा चोरघे, जयश्री बादल, अश्विनी पवार, स्नेहा भगत, रवींद्र वाडकर, प्रमोद गायकवाड, सुषमा सोरटे, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
पुष्पा चौधरी यांनी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुरुवात करून दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी शेवटची ५१ वी लावणी गायली.
पुष्पा चौधरी म्हणाल्या, लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी मी विश्वविक्रमाचा प्रयत्न केला. डिजे च्या काळात जुन्या पारंपरिक लावण्या मागे पडत आहेत. कलाकारांच्या माध्यमातूनच ही कला जिवंत राहणार आहे. यासाठी विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्ण केला.
त्यांच्या स्वामिनी अकॅडेमी मधील गायकांनी कोरस साठी साथ दिली. पुण्यातील नामवंत वादक हर्षद गणबोटे की ज्यांनी सुरेखा पुणेकरांसोबत १५ वर्ष ढोलकी वाजवली यांच्या टीमने अतिशय सुंदर वाद्य वाजवली. तसेच उषा मंगेशकर यांच्या गाण्यांना साथ देणारे कुंभार सर यांनी सुंदर गिटार वाजवली.
नेहमीच राया तुमची घाई, चला जेजुरीला जाऊ, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, कुण्या गावाचं आलं पाखरू, कळीदार कपूरी पान, खेळताना रंग बाई होळीचा, ढोलकीच्या तालावर, बुगडी माझी सांडली ग, अशी एकाहून सरस आणि गाजलेली लावणी गीते पुष्पा चौधरी यांनी सादर केली.वॅलेंटीना वूमेन्स इम्पॉवेरमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला.