पुणे (ता. २७): भारत-पाकिस्तान दरम्यान १९६५मध्ये झालेल्या युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धातील भारतीय सैन्यदलाच्या पराक्रमाची व महत्त्वाच्या लढायांची छायाचित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना येत्या शनिवारी मिळणार आहे.
माजी सैनिकांची ‘ऑलिव्ह ग्रीन’ ही स्वयंसेवी संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित करत आहे. फर्ग्युसन रस्त्यावरील संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात (रानडे इन्स्टिट्यूट परिसर) शनिवारी (ता. २९) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ते सर्वांसाठी खुले असेल. प्रदर्शनाचे उद्घाटन सामरिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत परांजपे यांच्या हस्ते होईल. १९६५च्या युद्धात पाकिस्तानचे विमान पाडणारे वीरचक्रविजेते एअर मार्शल (नि.) प्रकाश पिंगळे यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे.
या वेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, ‘ऑलिव्ह ग्रीन’चे संचालक लेफ्टनंट कर्नल (नि.) अवधूत ढमढेरे, अधिसभा सदस्य अॅड. इशानी जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. लष्करी इतिहासविषयक तज्ज्ञ नितीन शास्त्री युद्धछायाचित्रांबाबत माहिती देणार आहेत. कच्छच्या रणात पाकिस्तानची घूसखोरी, हाजी पीर, असल उत्तरच्या लढाईत भारतीय सैनिकांनी मिळवलेला विजय, लाहोरच्या दिशेने केलेली कूच आदींची छायाचित्रे व कात्रणे प्रदर्शनात पाहता येतील.
वृत्तपत्रविद्या विभागात युद्ध छायाचित्रांचे प्रदर्शन
Date: