पुणे-अल्पवयीन मुलास जीवे मारण्याची भिती दाखवत स्वत:च्याच घरातून दागिने आणि रोकड चोरण्यास भाग पाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या अल्पवयीन मुलाने स्वत:च्या घरातून पाच महिन्यांत तब्बल २५ लाखांचे दागिने आणि २० हजारांची रोकड भामट्यांकडे सोपवली. हा प्रकार उघडकीस आल्यावर पालकांनी पोलिसांत धाव घेत तीघांविरुध्द तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा सराईतांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
एका पंधरा वर्षीय मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनूसार, येरवडा पोलिसांनी रोहीदास नवनाथ ओव्हाळ( २९, जाधवनगर, येरवडा), रेहान शब्बीर कुरेशी(२५, येरवडा) आणि स्टिफन जॉन शिरसाट(१९, रा.वडगाव शेरी) या तिघांविरुध्द लहान मुलास चोरी करण्यास भाग पाडल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादींचे किराणा मालाचे दुकान आहे. ते एकत्र कुटूंबात रहातात. त्यांचे स्वत:चे, भावाचे आणि आईचे दागिने हे त्यांच्या आईच्या ताब्यात ठेवलेले होते. त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने त्यांच्या आईने कपाटातील दागिने तपासले, तेंव्हा त्यांना कपाटात दागिने नसल्याचे आढळले. त्यांच्या आईने कुटूंबाला याबाबत माहिती दिली. कुटूंबातील सर्व सदस्यांकडे विचारणा करण्यात आल्यावर त्यासंदर्भात कोणालाच काहीच माहिती नव्हती. दरम्यान, फिर्यादी यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या मुलाला विचारणा केली असता, तो तणावात दिसला. त्याला विश्वासात घेतले असता, ‘ वो लोग मुझे मार देगे, मैने नाम बताया तो मार देंगे’ असे बडबडू लागला.त्याला पोलिसांत तक्रार केल्यावर काही होणार नाही असे सांगितल्यावर त्याने सांगितले की, त्याच्या समवयस्क मित्राने रोहीदास, रेहान आणि स्टिफन बरोबर सात महिन्यांपूर्वी ओळख करुन दिली होती. काही दिवसांनंतर त्यांनी ‘आमच्या तिघांना घरातून पैसे आणून दे, अमाचे रेकॉर्ड माहित आहे का किती खराब आहे? नाहीतर तुला मारुन टाकू’ अशी धमकी दिली. त्यांच्या धमकीला घाबरुन जानेवारी महिन्यापर्यंत त्याने घरातून २० हजाराची रोकड त्यांना आणून दिली. दरम्यान, आजोबा आजारी असल्याने घरात होते. यामुळे आरोपींना पैसे देता आले नाहीत. यामुळे आरोपींनी घरच्यांनाही मारुन टाकू अशी धमकी दिल्याने मुलाने दागिने चोरुन आरोपींच्या स्वाधीन केले.
दरम्यान आरोपी दागिने विक्रीसाठी एका ठिकाणी येणार असल्याची खबर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानूसार तीघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३३ तोळे ६९० ग्रॅम सोने चार लाखाची रोकड असा १४ लाख ४२ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांनी काही दागिने गहाण ठेऊन रोकड घेतली होती. यातील ६० हजार रुपये त्यांनी ऐषोआरामात उडवले आहेत.ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.