महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
हडपसरमधील सर्व्हे नं. १५ मधील मॅटर्निटी होमसाठी असणारे आरक्षण, हेमंत करकरे उद्यान, सर्व्हे नं.१६ मधील धोबी घाट आणि शहिद सौरभ फराटे स्मारकासाठी आरक्षित केलेली जागा खासगी बिल्डरच्या घशात घातली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केला असून ही जागा विकसित करुन वाचवा अशी विनंती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार हडपसर येथील सर्व्हे नं. १५ व सर्व्हे नं. १६ मध्ये मॅटर्निटी होम (एमएच ३१) साठी १५०२.०० चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. तसेच सर्व्हे नं. १६ मध्ये धोबी घाटसाठी ५०० चौरस मीटर जागा आरक्षित केली आहे. याप्रमाणे, सर्व्हे नं. १६ मध्ये शहिद सौरभ फराटे स्मारकाच्या विकासासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, जो १९ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत सभा क्रमांक ३२, विषय क्रमांक ७३९, व ठराव क्रमांक २०९ नुसार एकमताने मंजूर करण्यात आला होता. तसेच सर्व्हे नं. १५ व १६ मधील जागांवर जलसंपदा विभाग व महापालिकेने वृक्षारोपणासाठी केलेल्या करारानुसार शहीद हेमंत करकरे उद्यान विकसित केले आहे. तसेच, या जागेवर मोठा उजवा कालव्याच्या उत्तरेकडील जागेवर उद्यान आरक्षित असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
या सर्व जागांचा संबंध पाटबंधारे विभागाशी असून, आरक्षण निहाय विकास व विनियोगासाठी महापालिकेने अनेक वेळा जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आणि माजी आमदार मोहन जोशी, स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे यांनी निवेदनाव्दारे दिली.
विकास आराखड्यानुसार, मॅटर्निटी होम (एमएस ३१) साठी सर्व्हे नं. १५ व १६ मध्ये अनुक्रमे ७५१.०० चौरस मीटर जागा असे एकूण १५०२.०० चौरस मीटर आरक्षित करण्यात आलेली आहे. महापालिकेने जलसंपदा विभागाकडे पत्रव्यवहार करून कार्यकारी अभियंता खडकवासला जलसंपदा विभागांकडून २१ ऑगस्ट २०१९ रोजी पत्र प्राप्त केले होते, त्यानुसार या जागेचे मूल्य ३ कोटी २५ लाख १८ हजार ३०० रुपये २८ऑगस्ट २०१९ रोजी डिमांड ड्राफ्ट काढून रक्कम संबंधित विभागाला अदा केलेली आहे.
परंतु महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत ३१ जानेवारी १८ रोजी झालेल्या ठरावानुसार सर्व्हे नं. १६ चा उल्लेख आहे, परंतु सर्व्हे नं. १५ चा उल्लेख कॅनॉलसाठी संपादित जागेवर ७/१२ अंमल नसल्यामुळे दिसून येत नाही. यामुळे महापालिका संबंधित जागा ताब्यात घेण्यास अडचणींचा सामना करत आहे. जललसंपदा विभागाकडून सर्व्हे नं. १५ चा उल्लेख करण्याची प्रक्रिया सुरू असून, तसेच महापालिकेकडे अनेक वेळा पत्र व्यवहार झाल्याचे सुद्धा माहिती अधिकारात दिसून येते.
आत्ताच्या ग्लोबल वार्मिंगच्या काळामध्ये उद्यानामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणे हे चिंताजनक आहे, वाढती उष्णता व वाढते तापमान पाहता उद्याने टिकली व वाढली पाहिजेत झाडे टिकली पाहिजे असे धोरण महापालिकेच्या असताना उद्यानामध्येच आरक्षण स्थलांतरित करण्याचा प्रयत्न का केला जातो ? हा नागरिकांसमोर फार मोठा प्रश्न आहे. महापालिकेने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा नागरी आंदोलन केले जाईल. असा इशाराही देण्यात आला आहे.
मोकळा श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण
खाजगी बांधकाम व्यवसायिकाच्या व स्वतःच्या फायद्यासाठी माजी नगरसेवकाच्या हट्टापोटी, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वरिष्ठ नेते व वरिष्ठ अधिकारी यांना धोबी घाट आणि शहीद सौरभ फराटे स्मारकाच्या बाबत अंधारात ठेवून सर्व्हे नं. १५ मधील आरक्षण स्थलांतरित करण्याचा उद्योग सुरू केला. यामुळे शहीद हेमंत करकरे उद्यान अडचणीत आणले गेले. खरंतर सातववाडी, गोंधळे नगर, १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, गंगानगर या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, युवक व लहान मुलांना व्यायामासाठी व खेळण्यासाठी तसेच मोकळा श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण आहे. आरक्षण स्थलांतरित झाल्यास या उद्यानाचा श्वास कोंडला जाईल यामुळे या परिसरातील नागरिकांची विशेषता जेष्ठ नागरिकांची फार मोठी गैरसोय होईल.
अचानक जागा बांधकाम व्यावसायिकाकडे गेल्याने संशय
महापालिकेने केलेल्या कार्यवाही कागदपत्रानुसार ही जागा जलसंपदा विभागाची होती. तसेच या मॅटर्निटी होमच्या जागेसाठी महापालिकेने ३ कोटी २५ लाख १८ हजार ३०० रुपये एवढी मोठी रक्कम सर्व्हे नं. १५ व १६ मधील आरक्षणासाठी जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळास डिमांड ड्राफ्ट द्वारे अदा करूनही अचानक या सर्वे नंबरमधील ही जागा बांधकाम व्यवसायिकाच्या ताब्यात गेल्याने संशयास्पद व्यवहार दिसून येतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यात आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत असून, पुणे महापालिका प्रशासनाने दाखवलेल्या हलगर्जीपणाबाबत साशंकता निर्माण होते. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

