पुणे (प्रतिनिधी) भोसरी येथे राहणारी दोन दाम्पत्य पुण्याहून नुकतीच फुकेत येथे सहलीसाठी गेले. चौघेही फुकेतमधील कलीम बीचवरील अमरीतसर रेस्टॉरंटमध्ये राहत होते. मात्र सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा झोका खेळताना अपघात झाला आणि दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना समजताच त्यांनी या दाम्पत्याच्या पुढील उपचारांसाठी भारतात आणण्याची सोय केली. मोहोळ यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या दाम्पत्यावर पुण्यात यशस्वीपणे उपचार सुरू झाले आहेत.
घडलेल्या प्रकाराबाबत माहिती अशी की, फुकेत सहलीत संध्याकाळी दोनपैकी एक दांपत्य शुभम फुगे (वय २७ वर्षे) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१ वर्षे) हे दोघेही एकत्र झोका खेळत होते. खेळता खेळता झोका इतका उंच गेला, की त्या झोक्यावरुन ते दोघे सटकले आणि जवळजवळ १० फूट उंचीवरुन जोरात खाली आदळले. या अपघातानंतर त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना ताबडतोब ‘पटाँग हॉस्पिटल’मध्ये दाखल केले गेले. शुभम यांचे मांडीचे हाड आणि सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. तेथे त्यांना फक्त पेन किलर गोळ्यांवर ठेवण्यात आले. ऑपरेशनसाठी त्यांना तत्काल भारतात आणणे गरजेचे होते.
या संदर्भात केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, घडलेल्या प्रकाराची माहिती मला माझ्या एका कार्यकर्त्याकडून मिळाली आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली. विमानाच्या खुर्चीत बसून येणे दोघांनाही अशक्यप्राय होते, त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर अरेंजमेंटची गरज होती आणि त्यासाठी डॉक्टर्सपासून तर हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूपसाऱ्या परवानग्या लागत होत्या. या सगळ्या परवानग्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्धपातळीवर काम सुरू होते. कारण स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या, त्याचीही पूर्तता या सगळ्या करावी लागली’
ते पुढे म्हणाले, ‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणाही दाम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती. शुभम आणि सिद्धी यांच्यासोबत असलेले दुसरे जोडपे अभिजीत पठारे आणि काजल मोरे यांनाही सोबतच लवकरात लवकर भारतात आणायचे होते. अखेर सर्व प्रयत्नांना यश येत त्यांना इंडिगो एयरलाइनच्या दोन वेगळ्या विमानाने त्यांना आणले. पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्यावर पुण्यात संचेती रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल केले.
गरजूंना मदतीचा हात देणे माझे कर्तव्यच : मोहोळ
परदेशात गेल्यावर अनेकांना विविध अडचणी येतात. असे प्रकार माझ्याकडे आल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असते. म्हणूनच गरजूंना मदतीचा हात देणे, हे मी माझे कर्तव्य समजून सर्व यंत्रणा कामाला लावत असतो. अशा प्रकारांमध्ये आमच्या सरकारचे सर्व विभाग संवेदनशीलपणातून मदत करत असतात. त्याचा फायदा निश्चितच गरजूंना होत असतो.