पुणे, २७ मार्च २०२५: पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीम हरसल्ला खानशी झाली. खान याने आपल्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यातून दोघांची ओळख वाढत गेली आणि त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला भेटायला बोलावले.
कांदिवली येथील फॅब हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर, आरोपीनं लग्नाचे आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढले. हॉटेलमध्ये राहिलेल्या या कालावधीत, आरोपीनं तिच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकून लैंगिक अत्याचार केला.यानंतर आरोपी तिला कारने पुण्यात घेऊन आला आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, तमीमने आपल्या तीन मित्रांना फोन करून बोलावले आणि त्या तिघांनीही पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच, आरोपींनी महागड्या गाड्या – रेंज रोव्हर (Range Rover), मर्सिडीज (Mercedes), पोर्शे (Porsche) – दाखवत स्वतःला श्रीमंत असल्याचे भासवले आणि तिची फसवणूक केली.
पीडितेची आर्थिक लूट करण्यासाठी आरोपींनी तिचे नग्न फोटो काढून धमकावले. सुरुवातीला तिने जवळपास १० लाख रुपये दिले. त्यानंतर, व्यवसाय सुरू करण्याच्या बहाण्याने आणि धमकावून तिला कर्ज काढण्यास भाग पाडले. अशा प्रकारे, एकूण ३० लाख रुपये आणि २ आयफोन आरोपींनी उकळले. पैसे मागितल्यावर तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
अॅड. तौसिफ शेख आणि त्यांच्या कायदेशीर टीममध्ये अॅड. सूरज जाधव, अॅड. क्रांती सहाने, अॅड. स्वप्नील गिर्मे, अॅड. नेहा पिसे आणि इतर सदस्यांनी संबंधित गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी कलेपडळ पोलीस ठाण्यात पीडित महिलेची कायदेशीर तांत्रिक बाबींमध्ये मदत केली.
अॅड. तौसिफ शेख यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आरोपींना मोकळे सोडून दिले जाऊ नये आणि त्यांना कायद्यानुसार योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांनी यावर भर दिला की, संबंधित आरोपींनी केवळ महिलांचा शारीरिक वस्तू म्हणून गैरवापर केला नाही, तर आर्थिकदृष्ट्याही त्यांचे शोषण केले आहे. त्यामुळे अशा विकृत मानसिकतेला वेळेत कायद्याने धडा शिकवणे आवश्यक आहे. तसेच, आम्ही पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत पूर्ण पाठिंबा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.अशा अमानुष घटनांसाठी कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी तातडीने योग्य कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.