पुणे : विकासासाठी आमचा कोणाचाही विरोध नाही. रिंगरोड करण्यासाठी लागेल, तेवढ्या आमच्या जमिनी घ्या. पण मोबदला मात्र दोन अडीच पटीने नव्हे, तर रेडी रेकनरच्या पाच पटीने मिळाला पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेत कदमवाकवस्ती येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.प्रारुप विकास योजनेतील 65 मीटर रुंद रस्त्यासाठी सन 2015 च्या नवीन भूसंपादन अधिनियमाव्दारे खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमीनीच्या भूसंपादन या प्रस्तावासंदर्भात कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये प्राथमिक बैठक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी वरील भूमिका घेतली.
यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकून विद्या गायकवाड, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे आदी अधिकारी उपस्थित होते.
पुणे रिंग रोड हा 65 मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे 17 एकर जमीन (67581.54 चौ. मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे. प्रशासनाला जमीन खरेदी करून क्षेत्र विकत घ्यायचे आहे.
पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे म्हणाले की, वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे. यामध्ये कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकहित व विकासासाठी क्षेत्र देऊन सहकार्य करावे. तसेच या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे, असेही पांढरे यांनी सांगितले.
याला प्रतिउत्तर देताना अनेक शेतकरी आक्रमक झाले. यावेळी बोलताना शेतकरी गणपत चावट म्हणाले की, क्षेत्र देण्यासाठी आमची काहीही अडचण नाही. पण रेडी रेकनरच्या अडीच पट मोबदला आम्हाला मान्य नाही. जर शासनाने रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला दिला, तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत. तसेच सर्कल जर रद्द केले तर व्यावसायिकांची दुकाने व शेतकऱ्यांची घरे वाचतील.
दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या. तसेच काही शेतकऱ्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले आहे. मात्र त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यांना मोबदला मिळणार का? यावेळी पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली आहे.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, उद्योजक बाळासाहेब भोसले, गणपत चावट, चित्तरंजन गायकवाड, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिर पठाण, सदस्य आकाश काळभोर, माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर, उदय काळभोर, सुशील काळभोर तुषार काळभोर, ग्रामसेवक अमोल घोळवे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र हे रिंग रोड मध्ये जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र देऊन विकासात हातभार लावावा. या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे.
- कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी, पुणे भूसंपादन विभाग
शासनाला आम्ही क्षेत्र देण्यासाठी तयार आहोत मात्र, रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला न देता तो रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला द्यायला हवा, ५ पटीने मोबदला मिळणार असेल तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत.
- गणपत चावट, शेतकरी, कदमवाकवस्ती (ता. हवेली)