मुंबई-दिशा सालियान हिचे आई-वडील यांनी काल पोलिस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या खूनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध असल्याची तक्रार दिली आहे, असे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.संजय गायकवाड म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरेंचा थेट संबंध असल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला असून आता आदित्य ठाकरे नैतिकता म्हणून राजीनामा देणार का असा सवाल त्यांनी केला आहे.
मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर या प्रकरणातील तथ्ये लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे आणि तेच मास्टरमाईंड असल्याचे सांगितले आहे. त्यांनी मुंबई पोलिसकडे आदित्य ठाकरे, अभिनेता दिनो मोरिया, अभिनेता सूरज पंचोली व त्यांचे अंगरक्षक, माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे आणि रिया चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.दरम्यान, उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असताना सतीश सलियन यांनी मुंबई पोलिसात तक्रार केल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात,असे सतीश सलियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी सांगितले. एनसीबीच्या चौकशी अहवालाचा हवाला देत सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. ही माहिती मुंबई पोलिसांना लेखी तक्रारीत देण्यात आली आहे.
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी पत्रकारांना सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. दिशा सालियन प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयितांना वाचवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.