मुंबई–दिशा सालियन मृत्यूप्रकरणी वकील नीलेश ओझा यांनी आदित्य व उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत. या प्रकरणात या दोघांनाही आरोपी करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. पण आता या ओझांचीच वादग्रस्त पार्श्वभूमी समोर आली आहे. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टानेही त्यांना एका प्रकरणात आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा ठोठावल्याचे उजेडात आले आहे.
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या? यावरून बरेच राजकारण रंगले आहे. पण आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांचे वकील नीलेश ओझा यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ओझा यांची वादग्रस्त कारकिर्द पुढे आली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये न्यायसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याप्रकरणी नीलेश ओझा यांना आर्थिक दंडासह 3 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणात जनहिति याचिका दाखल करणाऱ्या राशीद खान पठाण यांनाही शिक्षा झाली होती. ओझा व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही प्रलंबित खटल्यांवरून आपल्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या आर्थिक दंडासह 3 महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती. ओझा यांच्यासह महाराष्ट्र व गोवा इंडियन बार असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विजय कुर्ले व एका एनजीओचे राष्ट्रीय सचिव राशीद खान पठाण यांनी आपल्या आरोपांद्वारे न्यायपालिकेला बंधन बनवण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोंदवले होते.
अधिवक्ता नीलेश सी. ओझा हे एक मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते मूलभूत मानवी हक्कांसंदर्भात जनजागृती व त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतात. ते सध्या मुंबईत वास्तव्यास असून, मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात वकिली करतात. त्यांचे ध्येय मानवतावादी जागतिक भारत निर्माण करणे आहे.
अॅड. नीलेश ओझा यांचा जन्म व संगोपन महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाले. तिथेच त्यांनी बीई (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स) पूर्ण केले. अभियंता ते वकिलापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, अॅड. नीलेश ओझा यांना एका आघाडीच्या पेमेंट प्रोसेसिंग कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर कालांतराने ते वकिलीकडे वळले.
नीलेश ओझा यांनी भारतीय न्यायालयांमधील पूर्वसूचना आणि प्रक्रियांच्या कायद्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शक, ‘खोट्या शपथपत्रांवर आणि खोट्या खटल्यांवर कारवाई कशी करावी (खोटी साक्ष कायदा)’, पवित्र वेद और इस्लाम धर्म, भगवद् गीता में ईश्वर के आदेश, चुकीचे निर्णय आणि पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध न्याय कसा मिळवायचा’, ‘मानवी हक्क नियमावली’ – जामिनाचा कायदा, ‘पोलीस, नागरिक आणि मानवाधिकार कायदा’ आदी पुस्तके लिहिली आहेत.