मुंबई : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेल्या आरोपावरुन आमदार रोहित पवार सभागृहमध्ये तर सभागृहाबाहेर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक आहेत. या दोघांनी जयकुमार गोरे यांच्याविरोधात सापळा रचला असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात काल केला.
मात्र त्यावर स्पष्टीकरण देण्याची परवानगी रोहित पवारांना देण्यात आले नाही. यावर त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे. जयकुमार गोरे यांच्याविरोधात एक गठ्ठा पुरावे आहेत, त्यांचा राजीनामा तर होणारच असे आव्हानच आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. ते म्हणाले, अंतिम आठवड्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा विषय आणला आणि सुप्रिया सुळे आणि माझे नाव घेतले. मात्र जेव्हा मी राइट टू रिप्लायची विनंती केली तर मला बोलू दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांच्या भाषणातून आमचे नाव रेकॉर्डवर आणण्यासाठी हे केले का, असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप केले. एका महिलेला एका मंत्र्याने अश्लील फोटो पाठवल्याचे आम्हाला एका महिला पत्रकाराने सांगितले, तिथून हा विषय सुरु झाला. महिलेच्या न्यायासाठी एक ते दोन फोन झाले असतील. मात्र 100-200 फोन केले नाही, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे हे या प्रकरणी हायकोर्टात बेलसाठी गेले आहेत. हे प्रकरण आणि फोटो पाहून चुकीचं इंटेशन असल्याचं कारण देत न्यायमूर्तीने जामीन नाकारला. असं सर्व प्रकरण असताना मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणू दिला जात नाही. उलट पत्रकारांनी प्रश्न विचारु नये म्हणून एका पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात आलं. आम्ही सभागृहात काही बोलू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझं आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं.
रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं (रोहित पवार) नाव घेतलं, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील नाव घेतलं. तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. तसेच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील. पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाहीत. आता तेथे कारवाई सुरू आहे. पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे
मात्र पीडित महिलेला सापळा रचून एक कोटींच्या खंडणीत अडकवण्यात आलं आहे. अरुण देवकर नावाचा पीआय आहे, त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. देहव्यापाराचे आरोप या पीआयवर आहेत. दुर्दैवाने त्या महिलेचा वकिल मॅनेज झाला. त्या वकिलाने फीचे पैसे घेऊन बोलावून तिथे देवकरने लावलेल्या ट्रॅपमध्ये महिलेला अडकवले. त्या पीडित महिलेला मी किंवा सुप्रीया सुळे यांनीही फोन केला नाही, असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी विधिमंडल परिसरात माध्यमांशी बोलताना दिले.
एक कोटी रुपयांची लाच घेताना पीडितेला पकडण्यात आले आहे, हे एक कोटी रुपये कॅश कुठून आली, कोणी आणली, असे प्रश्न उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की एवढी मोठी रोख रक्कम घेऊन येणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत का? ते मंत्र्यांचे मित्र आहेत म्हनु न त्यांना सोडून दिले जाणार असाही टोला त्यांनी लगावला.
ते म्हणाले की, तुषार खरात नावाच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप झाले. का तर त्याने यांच्या (जयकुमार गोरे) विरोधात बातम्या केल्या. यांनी (जयकुमार गोरे) मृत व्यक्तीची नावाने असलेली जमीनी लाटल्या, पैसे खालले याच्या बातम्या त्याने केल्या. ते मंत्री असल्याने त्यांचा हक्कभंग स्वीकारला जातो, मात्र आम्हाला हक्कभंग आणू देत नाही. आम्हाला हक्कभंग आणू दया. आम्ही पुराव्यांचा गठ्ठे मुख्यमंत्र्यांना आणून देऊ, असेही रोहित पवार म्हणाले.जयकुमार गोरे यांच्या विरोधात एवढे पुरावे आहे की त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असे आव्हानच रोहित पवार यांना दिले आहे.