बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद यांच्या कारचा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेत सोनाली यांचा भाचाही जखमी झाला आहे. या दोघांवर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सोनू सूद तातडीने नागपुरात दाखल झाला आहे.सोनू सूद याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली सूद यांचा सोमवारी रात्री मुंबई – नागपूर हायवेवर अपघात झाला. त्यांची कार एका ट्रकला धडकली. त्यात गंभीर जखमी झाल्या. हा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची बहीण व भाचा सोबत होता. सोशल मीडियावर सोनाली सूद यांच्या गाडीचे काही फोटो व्हायरल झालेत. त्यात कारचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सूद यांच्या कारने अतिशय वेगाने ट्रकला धडक दिली असावी असा अंदाज बांधला जात आहे.
या अपघातानंतर सोनाली सूद व त्यांचा भाचा या दोघांना नागपूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार केले जात आहेत. दुसरीकडे, या अपघाताची माहिती कळताच सोनू सूद तातडीने नागपूरच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आपल्या पत्नी व भाच्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. ते सध्या त्यांच्यासोबतच आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणी काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही.रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सोनाली व त्यांच्या भाच्याला पुढील 48 ते 72 तास सातत्याने निगराणी व वैद्यकीय देखभालीत ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनेता सोनू सूदने पत्रकारांशी बोलताना या अपघाताची पुष्टी केली आहे. त्याने सांगितले की, माझी पत्नी सोनाली व भाच्याचा नागपूर – मुंबई महामार्गावर अपघात झाला. सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. हे दोघेही आश्चर्यकारकरित्या बचावले. सध्या त्या्ंच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुटुंब लवकरच मुंबईला परतण्याची अपेक्षा आहे.
सोनू सूद व सोनालीचा 1996 मध्ये विवाह झाला. सोनाली या मूळच्या आंध्र प्रदेशाच्या आहेत. या दाम्पत्याला अयान व इशांत अशी दोन मुले आहेत. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएची पदवीही घेतली आहे. ती एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. विशेष म्हणजे सोनू सूद हा आपल्या कामांमुळे कायम चर्चेत असतो. पण सोनाली याहून अगदी उलट आहे. तिला तिचे खासगी आयुष्य जपायला आवडते.