मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मंगळवारी विधान परिषदेत भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. त्यांनी त्यांचा उल्लेख ‘नेपाळी’ असा केला. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे. मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असे त्याला वाटते, असे ते म्हणालेत. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परब यांच्या बाजूलाच बसले होते हे विशेष.अनिल परब आज विधानपरिषदेत संविधानावरील चर्चेत बोलताना म्हणाले की, हल्ली काय झाले आहे की मांसाहार करायचा नाही असे कुणीतरी सांगत आहे. त्यांना हा अधिकार कुणी दिला? मटण कोणते खायचे, झटका मटण खायचे की हलाल खायचे हे तुम्ही सांगणार का? एक मंत्री सांगतो की आपण काय खायचे आणि काय खायचे नाही. राज्यात हिंदू – मुस्लिम वाद होतील असे वातावरण आहे.
या देशाविरोधात काम करणारा कोणताही व्यक्ती मग तो हिंदू असो की मुस्लीम तो आपल्या देशाचा शत्रू आहे असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. दुर्दैवाने त्यावेळी जे काही बॉम्बस्फोट झाले, ज्या काही गोष्टी झाल्या, त्यात मुस्लीम समाजाचे लोकं आढळले. म्हणून बाळासाहेबांनी त्यावेळी ही भूमिका मांडली होती.पण आज काय सुरू आहे? माझ्याकडे एका सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे. तो अख्खी रात्र जागते रहो म्हणून ओरडत असतो. त्याच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत असे त्याला वाटते. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरत आहे. त्याला वाटते, त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय. त्याचा असा समाज झालाय. हल्ली तो अशी शाल-बिल घेऊन फिरत आहे. अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. आमच्यात तेवढी ताकद आहे.अनिल परब यांनी यावेळी नीतेश राणे यांचे नाव घेतले नाही. पण त्यांचे हावभाव पाहता त्यांचा रोख त्यांच्याकडेच होता हे स्पष्ट आहे. यावेळी त्यांच्या बाजूला हसलेले उद्धव ठाकरेही गालातल्या गालात हसत होते.
अनिल परब पुढे म्हणाले, माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी आम्हाला स्वतःच्या धर्माचे संरक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावर जाणिवपूर्वक अन्याय करण्याचे शिकवले नाही. जाती-जातीत तेढ वाढवणे शिकवले नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांत ज्या काही घटना घडल्या आहेत, या घटना पाहिल्या तर जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.
आज सभागृहात वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. मी सर्वच गोष्टींवर भाष्य करत नाही. संविधानावर चर्चा करण्यास दोन दिवसही पुरणार नाहीत. पण संविधानाने मला जे अधिकार दिलेत, त्यांची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला विरोधक म्हणून आहे ना सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळे मी राहायचे कसे? मी खायचे काय? बोलायचे काय? याचे अधिकार दुसरा कुणी ठरवू शकत नाही. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच. त्यात दुसऱ्या कुणाचा हस्तक्षेप मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही, असे अनिल परब म्हणाले.
ते पुढे म्हणाले, निधीचे समान वाटप हा घटनेने दिलेला अधिकार आहे. पण केंद्र सध्या राज्याच्या बाबत निधी वाटपात दुजाभाव दाखवत आहे. आता राज्यात सुद्धा असाच प्रकार सुरू झाला आहे. माझ्या मतदार संघात 100 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या. आता त्याठिकाणी निधी दिला जात नाही. आम्ही काम करायचे नाही का? एका वॉर्डात निधी दिला जातो आणि दुसऱ्या वॉर्डात निधी दिला जात नाही.खालच्या सभागृहात आम्हाला अद्याप विरोधी पक्षनेता दिला नाही. का दिला नाही हे आम्हाला लिहून द्या असे आम्ही अध्यक्षांना बोललो. पण ते यावर बोलायला तयार नाहीत. आम्ही काय गुन्हा केला हे त्यांनी सांगावे. आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणून होत नसेल तर तसे लिहून द्यावे. पण तेही तसे करत नाहीत.
अनिल परब म्हणाले, आम्ही विधानपरिषदेच्या सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव नियमानुसार घेण्याची गरज होती. पण तो तुम्ही नाकारला. तो कोणत्या कायद्याने नाकारला हे तरी दाखवा. आमचा अविश्वास प्रस्ताव नाकारला आणि लगेच तुम्ही विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. केवळ तुम्ही घटनापीठावर बसलेला आहात म्हणून तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे आता आम्ही थेट सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

