मंत्रिपदाची इच्छा, पण उपाध्यक्षपदावर बोळवण
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करतील.विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजकुमार बडोले, संजय बनसोडे व अण्णा बनसोडे या 3 नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर या अण्णा बनसोडे यांनी बाजी मारली. या पदासाठी महायुतीकडून अण्णा बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तो सोमवारी दुपारी झालेल्या पडताळणीत वैध ठरला. त्यामुळे त्याची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी दुपारी सभागृहात करतील.
अण्णा बनसोडे यांनी महापालिकेत 3 टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करतात. ते 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 ला त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. पण 2019 मध्ये ते पुन्हा विधानसभेत पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि 2024 मध्ये ते पुन्हा विधानसभेवर पोहोचले. अजितदादांच्या बालेकिल्ल्यातील पिंपरीचे शिलेदार म्हणून त्यांना ओळखले जाते.
औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराला आत्तापर्यंत एकदाही कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. आत्तापर्यंत शहरातील 5 नेत्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले महामंडळ मिळाले. मात्र शहराच्या 40 वर्षाच्या इतिहासात एकदाही कॅबिनेट किंवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेले आणि तीनवेळा निवडून आलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे मंत्रिपदासाठी तीव्र इच्छुक होते. परंतु, मंत्रिपदाऐवजी आमदार बनसोडे यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला होता. पण भाजपने 2017 म्ध्ये त्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. सध्या भाजपचे विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेत दोन असे चार आमदार या शहरात आहेत. राष्ट्रवादीचा एकमेव आमदार आहे. महायुतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांनी आमदार बनसोडे यांना उपाध्यक्षपद देऊन या शहराला महत्त्व दिले आहे. उपाध्यक्ष पदावर बसण्याची संधी मिळाल्याने बनसोडे यांना राज्याच्या विधिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावता येईल. बनसोडे यांना ताकद देऊन महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

