उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, : ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्य दिले आहे, मात्र त्याचा गैरवापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा अन्य व्यक्ती अथवा समाजघटकाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी होऊ नये.”
सध्या रंगभूमीवरील प्रयोगांसाठी रंगभूमी परीक्षण मंडळ आहे, तर चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड कार्यरत आहे. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजवर कोणतेही प्रभावी नियमन नाही. त्यामुळे त्यावर प्रदर्शित होणाऱ्या सामग्रीवर कोणतेही बंधन नाही. “या माध्यमांवर होणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे योग्य ती आचारसंहिता तयार करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
लोकसभेतही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. ओटीटी आणि स्टँडअप कॉमेडी शोजवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर चौकट ठरवावी, अशी मागणी त्यांनी संसदेत केली होती.
डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, राज्य शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करावा आणि योग्य ती आचारसंहिता लवकरात लवकर लागू करावी.