मुंबई:’राजसंन्यास’ ही राम गणेश गडकरी यांची कादंबरी, तसेच ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘प्रणयी युवराज’, ‘स्वप्न भंगले रायगडाचे’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ यासारख्या नाटक अन् चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सभागृहात केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, राज्यात आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे आपण नेहमी नाव घेतो. एवढी मोठी संत परंपरा, महापुरुष लाभले असताना करही समाजद्रोही लोकांकडून जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान केला जातो. अलीकडेच नागपूरचं उदा. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करत ज्या प्रकारे धमकी दिली, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्याला एका महिन्यानंतर अटक झाली. तर दुसरीकडे राहुल सोलापूरकर नावाच्या व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यावर एफआयआरदेखील झाला नाही. यावर आपण काही कडक कायदा करणार का नाही.
अमोल मिटकरी पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर आपण तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. नेत्यावर कुणी बोलले तर आक्रमक रित्या पुढाकार घेत कारवाई करा म्हणतो. पण महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा एखादा चिल्लर माणूस अवमान करत असेल आणि त्याला अटक होण्यासाठी महिनाभर लागत असेल तर हे महाराष्ट्राच्या दृष्ठीने चांगले नाही.
थोरातांची कमळामधून दाखवला अत्यंत वाईट प्रसंग
अमोल मिटकरी म्हणाले की, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची एक परंपरा आता सुरू झाली आहे. म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य करा आणि पोलिस सुरक्षा घेत सुरक्षित स्थळी जा हे राज्याला न शोभणारे आहे. एका चित्रपटानंतर तरुण पिढीने संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती घेण्यास सुरूवात केली. संभाजी महाराजांवर 20 नाटकं आणि 35 ते 40 चित्रपट आहेत जी युट्युबवर उपस्थित आहेत. उदाहरण द्यायचे असेल तर थोरातांची कमळा हा चित्रपट तुम्ही पाहिला तर त्यामध्ये संभाजी महाराज ते थोरात्याच्या कमळेला थेट बोहल्यावरुन उचलून नेतानाचा अत्यंत वाईट प्रसंग दाखवलेला आहे. इतकंच नाही सरकारकडून एक पुस्तक विकले जाते, त्यामध्ये संपूर्ण गडकरी असे एक नाटक आहे. म्हणजे रामगणेश गडकरी यांचे ते पुस्तक आहे त्या नाटकाचे नाव आहे राजसंन्यास आणि त्यामध्ये असे लिहले आहे की, संभाजी महाराज आणि तुळसा यांच्या नात्यामधील ते नाटक आहे, अशी पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी.