नवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात भंगार व्यापारी किताबुल्ला हमीदुल्ला आणि त्यांच्या पत्नीला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यानंतर त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला. या कारवाईविरोधात हमीदुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि मालवण नगर परिषदेला नोटिस बजावली.
गेल्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ आमनेसामने होते. या सामन्यात भारतानं विजय मिळवला. त्यानंतर किताबुल्ला यांच्या कुटुंबानं भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. यानंतर मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तारकर्ली रोडवरील किताबुल्ला हमीदुल्ला खान यांचं दुकान अधिकृत असल्याचं सांगत ते बुलडोझरनं पाडलं.कोणतीही पूर्वसूचना किंवा इशारा न देता घर आणि दुकान जमीनदोस्त केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. किताबुल्ला हमीदुल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली. ‘सर्वोच्च न्यायालयानं बुलडोझर जस्टिसविरोधात कठोर सूचना दिलेल्या आहेत. अशा कारवाया रोखल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेनं केलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करुन आमचं घर आणि दुकान कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पाडण्यात आलं,’ असं हमीदुल्ला यांनी याचिकेत नमूद केलं आहे.आणि आपण कोणतीही भारत विरोधी घोषणा दिल्याचा त्यांनी इन्कार केला आहे.