पुणे-येरवडा परिसरातील नामांकित ईशान्य मॉल मध्ये असलेल्या प्लिंक्स पब मध्ये दोन तरुण डान्स फ्लाेअरवर डान्स करत असताना त्यांचा धक्का इतर महिलांना लागत हाेता. त्यामुळे सदर तरुणांना समजवण्यास गेलेल्या महिला बाऊंसरचा आरोपींनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर येरवडा पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ७९, २९६, ११५ (२) , ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेश दादाभाऊ घावटे (वय- ३४,रा. अण्णापूर, ता.शिरुर,पुणे) व यश कोतवाल (रा.काेरेगाव भीमा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. सदर आरोपी विरोधात ३० वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधीत घटना ही २३ मार्च राेजी रात्री पावणेएक वाजण्याचे सुमारास ईशान्य मॉल मधील प्लिंक्स पब मध्ये घडली आहे.
संबंधित महिला बाऊंसर ही मागील दोन वर्षापासून प्लिंक्स पब मध्ये नाेकरी करत आहे. तिची डयुटी सायंकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत असते. २२ मार्च राेजी रात्री सदर महिला तिच्या इतर सहकाऱ्यांसह काम करत असताना, हॉटेल किंग्ज फुडस अॅण्ड ब्रेवरेजस येथे रात्री दहा वाजता पब मध्ये गर्दी वाढली हाेती. त्यावेळी व्हीआयपी टेबल क्रमांक ४ येथे चारजण जेवण व मद्यपान करत बसले हाेते. २३ मार्च राेजी मध्यरात्री पावणेएक वाजता सदर टेबलवर बसलेला एक तरुण व त्याचा मित्र हे डान्स फ्लाेअरवर डान्स करत हाेते. त्यावेळी त्यांचा डान्स करणाऱ्या इतर महिलांना धक्का लागत हाेता. त्यामुळे त्यांना तक्रारदार यांनी बाजूला डान्स करण्यास सांगितले. त्यावर चिडून त्यातील एका तरुणाने मी बाजूला जाऊन डान्स करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणाला. त्यानंतर त्याने महिलेस अश्लील शिवीगाळ करुन तिला मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे बाेलत आक्षेपार्ह कृत्य केले. त्यामुळे महिलेने घाबरुन हॉटेलचे सुपरवायझर यांना बाेलवले.थाेड्यावेळाने तेथे मॅनेजरसह इतरही स्टाफ आला. त्यांनी संबंधित दोन आरोपींना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघे ऐकूण घेण्याचे मनस्थितीत नव्हते. त्यांनी महिलेसह स्टाफला शिवीगाळ करणे सुरुच ठेवल्याने त्यांना पब बाहेर घेऊन जाण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती हाॅटेलने दिल्यावर पोलिस सदर ठिकाणी येऊन त्यांनी संबंधित दाेघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले करत आहे.