पुणे– मनपाच्या वतीने कोथरूड मध्ये विकसित केलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन सिंथेटीक टेनिस कोर्टचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हे क्रीडांगण म्हणजे कोथरूड-कर्वेनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा…आहे या शब्दात स्वप्नील दुधाने आणि माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांनी म्हटले आहे.

त्यांनी सांगितले कि,’ आमच्प्रया भागातील आणि पर्यायाने शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आपण २०१७ साली लोकप्रतिनिधी या नात्याने पहिल्याच टर्ममध्ये पुणे मनपाच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल विकसित केले आहे. या ठिकाणी सन २०१७ आणि सन २०२० साली विकसित केलेल्या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिस कोर्टचाही समावेश असून या टेनिस कोर्टचे नूतनीकरण आणि अद्ययावतिकारण होणे, काळाची गरज बनले होते. याचसाठी वेळोवेळी पाठपुरावा करत तब्बल २५ लक्ष रुपये निधी मंजूर करून आणत आपण या कामाचा शुभारंभ केला होता.गेल्या आठ वर्षांपासून अनेक खेळाडूंनी या ठिकाणी सराव करत आपल्या पुणे शहराचा नावलौकिक वाढवला आहे. आज खेळाडूंच्याच शुभहस्ते नूतनीकरण सोहळा संपन्न होत असताना अनेक खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या तब्बल चार दशकांपासून टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देणारे दत्तात्रय शिंदे आणि अनेक वर्षांपासून त्यांचा वारसा जपत खेळाडू या क्रिडा संकुलात घडवणारे प्रशिक्षक रोहित शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्व क्रीडाप्रेमी आणि पालक वर्गाला आपल्या पाल्याला खेळातही प्राविण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देत पुणे शहराला नवी ओळख निर्माण करून देण्यात योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
