पुणे, दि. २४: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या ७८६ उमेदवारांचे म्हणणे २५ मार्च ते दिनांक ४ एप्रिल २०२५ या कालावधीत ऐकून घेण्यात येणार असून उमेदवारांनी सुनावणीसाठी आपल्याला दिलेल्या तारखेला सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित रहावे, असे कळविण्यात आले आहे.
१० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याबाबतचे नियोजन उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस. व परीक्षार्थींच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी या सुनावणीस स्वखर्चाने उपस्थित रहावे. दिलेल्या दिवशी समक्ष हजर न राहिल्यास सदर प्रकरणी उमेदवाराला काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.
सुनावणीच्या वेळी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच चालक परवाना, बैंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी उमेदवाराच्यावतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.