पुणे, दि. २४ मार्च २०२५: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजनेला आता केवळ सात दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला या योजनेची मुदत संपत आहे. पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत उच्च व लघुदाबाच्या १० हजार ३०६ ग्राहकांनी २७ कोटी ६४ लाख रुपयांचा भरणा करून थकबाकीमुक्ती मिळवली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह नवीन वीजजोडणीची गरज असो किंवा नसो, जागेवरील वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या दि. ३१ मार्चपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी केले आहे.
पुणे परिमंडलामध्ये अभय योजनेसाठी ११ हजार ९९७ वीजग्राहकांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातील ९ हजार ४६४ ग्राहकांनी २३ कोटी ३८ लाखांचा एकरकमी भरणा केला आहे तर ८४१ ग्राहकांनी हप्त्यांमधील ४ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यातील ४ हजार २२७ ग्राहकांकडे वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून २ हजार ५१३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे तर ५ हजार २५७ ग्राहकांनी विजेची गरज नसतानाही या योजनेतून थकबाकीमुक्तीला प्राधान्य दिले आहे.
या योजनेत दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सहभागी होता येईल व योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होत असून ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीचा भरणा करावा लागत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

