राज्य गद्दारांच्या आदर्शावर चाललंय का? तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करा
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची जोरदार पाठराखण करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली. कुणाल कामरा हा सत्यच बोलला. त्याने जनभावना मांडली. जे चोरी करतात ते गद्दारच असतात, असे ते म्हणालेत.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रकरणी कुणाल कामराच्या मुंबईतील खार येथील एका हॉटेलातील स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हाही दाखल केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्याची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी स्पष्ट करू इच्छितो की, काल कॉमेडी शोच्या सेटची जी तोडफोड करण्यात आली, ती शिवसैनिकांकडून करण्यात आली नाही. त्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. ती तोडफोड गद्दारांनी (शिंदे गट) केली आहे. आपले राज्य सध्या शिवरायांच्या आदर्शावर चाललंय की, गद्दारांच्या आदर्शावर चालले आहे?
जे भेकड लोक आहेत, ते त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला म्हणून तोडफोड करत आहेत. पण या गद्दारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला तेव्हाही या लोकांनी त्याचा निषेध केला नाही.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यावरील व्यंगात्मक टीकेनंतर ज्या लोकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटचे नुकसान केले, त्या लोकांकडून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की, न्याय हा सर्वांना सारखाच असला पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. तशीच नुकसान भरपाई काल कॉमेडी शोच्या सेटच्या तोडफोड प्रकरणात मि्ळाली पाहिजे.
ज्या गद्दार भेकड लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान चालतो, पण आपल्या गद्दार नेत्याचा अपमान चालत नाही, अशा तोडफोड करणाऱ्या लोकांकडून दामदुपटीने नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काही चालत नाही हे दाखवण्यासाठीच एकनाथ शिंदे यांच्याकडून हा सर्व प्रकार केला जात आहे, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या सोशल मीडिया पेजवरूनही या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंवर टीका केली म्हणून स्टुडिओ फोडणारे कावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह बोलले गेले, तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का? यांचे हिंदुत्व केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्यांपुरते मर्यादित आहे का?” असा सवाल ठाकरे गटाने यासंबंधी उपस्थित केला आहे.

