छात्या बडवू नका -धडा शिकविणारच ; कॉमेडियन कामरा वरून सभा तहकूब अन CM आक्रमक
मुंबई- देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा सांगतो, आम्हाला स्टँडअप कॉमेडी आवडते. आम्ही ती पाहतो. त्याला दाद देणारे लोकं आहोत. पण त्याच्या नावाखाली मध्यंतरीच्या कालावधीत रणवीर अलाहाबादियाने ज्या प्रकारचे स्टेंटमेंट दिले, त्या असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. हे लोक आई-वडिलांसंदर्भात घाणेरडे स्टेटमेंट देतील आणि कुठल्यातरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तसल्या गोष्टी चालवतील हे चालणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण शांत बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही. म्हणून यासंदर्भात जी काही कडक कारवाई करता येईल, ती केली जाईल. त्यात कुठल्याही परिस्थिती कुणीही कितीही दबाव आणला तरी संबंधितांना सोडले जाणार नाही.
आता जे काही लेफ्ट लिबरल विचार तयार झालेत. याला अर्बन नक्षलवादीही म्हणता येईल. त्यांचा उद्देश एकच आहे. समाजातील मानकांना अपमानित करणे, देशातील संस्थांना अपमानित करणे, देशांच्या संस्थात्मक संरचनेवरून लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशी विधाने करणे अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही. त्यामुळे यासंदर्भात कठोरातील कठोर कारवाई केली जाईल अशी मी ग्वाही सभागृहाला देतो, असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे कुणाल कामरा यांनी हे अपमानास्पद शब्द वापरले ते सहन केले जाणार नाहीत. त्यांनी माझ्यावर शिंदेंवर सर्वांवर टीका करावी. व्यंग करावे. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपाऱ्या घेऊन कुणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचे काहीही कारण नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, अभिव्यक्तीवर घाला घालण्यात येत असल्याच्या छात्या बडवू नका. या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. काहीही झाले तरी अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. ही मंडळी महाराष्ट्राचे मानसिक आरोग्य खराब करण्याचे काम ही मंडळी करत आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचे माझे राजकीय मतभेद असू शकतात, पण राज्यातील एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदरभाव आहे, त्या नेत्याविषयी कुणीतरी इतक्या खालच्या दर्जाचे काहीतरी बोलतो व आमच्या समोरील बाकावरील काही जण हे तत्काळ त्याचे समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचे ट्विट येते, दुसऱ्याची क्लिप येते, तिसऱ्याची क्लिप येते. त्यामुळे हे कामराशी ठरवून चालले आहे की? कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येथे आली आहे.
राहुल गांधी लाल रंगाचे एक छोटेसे संविधान घेऊन फिरतात. ते संविधान हातात घेऊन कामराने एक फोटो ट्विट केला आहे. त्यांनी ते संविधान वाचले असते तर त्यांनी असा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, अमर्यादित आहे. तथापि, त्याची मर्यादा काय आहे? तुम्ही ज्याक्षणी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता, त्या क्षणी तुमचे स्वातंत्र्य मर्यादित होते. ही मर्यादा ठरलेली आहे. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कुणाल कामरावर झालेल्या वादावर निवेदन केले. ते म्हणाले, सभागृहात उपस्थित झालेला विषय अतिशय गंभीर आहे. आपण कुणीही अशा प्रकारच्या विचाराचे नाही की कुणी आपले मत अभिव्यक्त करू नये. किंबहुना हास्य असेल किंवा व्यंग असेल, त्याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. एखादे राजकीय व्यंग झाले तरी, त्या व्यंगातून आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे लोक आपण आहोत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही. खरे म्हणजे, हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्याचा इतिहास पाहिला तर देशातल्या उच्चपदस्थ लोकांसंदर्भात मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो अथवा न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचे बोलणे, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा पद्धतीने बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे.
मुळात या व्यक्तीला एकप्रकारे वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की, 2024 च्या निवडणुकीने जनतेनेच ठरवून दिले की, कोण खुद्दार व कोण गद्दार आहे. हा कामरा महाराष्ट्रातील जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने हिंदूहृदयसम्राट यांच्या विचारांचा वारसा कुणाकडे आहे हे दाखवून दिले आहे. तो वारसा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दिला. त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन कुणी काम करत असेल तर सहन केले जाणार नाही.

