मुंबई-मी तर रोजच टीकात्मक लिहित असतो. ते माझे काम आहे. त्यामुळे माझ्यावर तर दररोजच गुन्हे दाखल होतील. विधानसभेतील सदस्यांचे कामकाज पाहिले तर त्यांच्यावर देखील रोज गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण वाचले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. कमजोर लोकांवर का गुन्हे दाखल करता? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदे हे या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचे देखील ते म्हणाले.
कुणाल कामरा वादावर संजय राऊत म्हणाले की, मी कुणाल कामराला खूप दिवसांपासून ओळखतो… तो आमच्यावर अशाच प्रकारे टिप्पणी करायचा. माझा असा विश्वास आहे की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर वैयक्तिक टिप्पणी नसेल तर ती स्वीकारली पाहिजे. जर टिप्पणी कोणत्याही राजकीय विचारसरणीवर असेल तर ती स्वीकारली पाहिजे. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. कुणाल कामरा यांचे कार्यालय, स्टुडिओची तोडफोड करण्यात आली… ही गुंडगिरी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 353(1)(b) (सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधाने) आणि 356(2) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती. रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी रात्री उशिरा, मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टिनेंटल कार्यालयात पोहोचले. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ येथे शूट करण्यात आला आहे. शिवसेना समर्थकांनी स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तो तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. कुणाल कामराला तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. यावरुन देखील संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
आता सभागृह हे खोक्यांनी भरलेले आहे. विधिमंडळात खोकेबाजांनी भरलेले असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांचे हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे, त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवले असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. ते सर्वच खोके बाज असल्याने सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, भूमिका नाही, नैतिकता देखील नाही. ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहमंत्रालय चालवणे झेपत नाही, हे आता स्पष्ट दिसत आहे. कालच्या घटने बद्दल मुंबई पोलिस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. हा संपूर्ण कट दीड ते दोन तास आधी शिजला. मग त्यावेळी मुंबई पोलिस काय करत होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्याची नाचक्की होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया वरून कुणाल कामरा यांना धमक्या दिल्या जात आहेत. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. मात्र, या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

