बंगळुरूच्या निरुपमा आणि राजेंद्र यांच्या नृत्याविष्कार ठरला नृत्य महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित दुसऱ्या पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाची उत्साहात सांगता
तिसऱ्या रोहिणी भाटे नृत्य महोत्सवात राज्याचा सांस्कृतिक विभाग सहभागी होणार!
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांचा डौलदार पदन्यास, समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा यांचा मेळ जमलेला नृत्याविष्कार हे नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने प्रस्तुत पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले.
श्रीकृष्णाच्या रासलिलेवर आधारित कथाभागातून सादर केलेल्या नृत्याविष्कारातून संवेदनशील अभिनयाचे, सुंदर देहबोलीचे दर्शन रसिकांना घडले. तर मनिषा नृत्यालयाने कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले. या कलाकृतीस रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
आजच्या कार्यक्रमात मुद्रा कथक नृत्य संस्थेने ‘गणेश ध्रुपद’ (कथ्थक), स्वरदा नृत्य संस्था ‘चरिष्णू’ (भरतनाट्यम्), आरोहिणी नृत्य संस्थेने ‘शिव ध्रुपद’ (कथ्थक), स्नेहललितने ‘तिल्लान’ (भरतनाट्यम्), रुपक नृत्यालयने ‘चतरंग’ (कथ्थक), शिल्पा नृत्यालयाने एक श्लोकी रामायण (कथ्थक), नृत्यांजली संस्थेचे श्री गणेश (भरतनाट्यम्), नृत्यभारती संस्थेचे राग सागर (कथ्थक), कलासाधनम् नृत्य संस्थेचे डमरु (भरतनाट्यम्), अर्चना नृत्यालयाचे ठुमरी (कथ्थक), रुपक कलासदनने अंजनेय स्तुती (भरतनाट्यम्) आदी नृत्याविष्कार सादर केले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील नृत्याविष्कार पाहून थक्क झालो. वास्तविक अशाप्रकारचा शास्त्रीय नृत्यासाठी समर्पित महोत्सव हा पुण्यातच होऊ शकतो, हे आजच्या महोत्सवाने दाखवून दिले आहे. रोहिणी ताईंच्या नावाने होणारा हा महोत्सव म्हणजे एकप्रकारे महादेव शंकरांची उपासना आहे. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था नृत्य संकुल उभारण्यासाठी प्रयत्सांनशील आहे. स्कृतिक विभाग त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.
ते पुढे म्हणाले की, रोहिणी भाटे नृत्य महोत्सव हा खरंच अविस्मरणीय आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य महोत्सवाचा प्रतिसाद पाहून; पुढील वर्षीचा तिसरा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देखील सहभागी होईल. त्यासोबतच सांस्कृतिक विभागाच्या वतीने आगामी ३६५ दिवस १२०० कार्यक्रम राज्यभर राबविणार असल्याची माहिती देखील मंत्री शेलार यांनी यावेळी दिली.
समारोप प्रसंगी पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात अनोखी आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, नृत्य गुरु शमाताई भाटे, मनिषा साठे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आयोजक अजय धोंगडे, संयोजक तथा भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.