पुणे दिनांक २३- जनसुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा… ! जनसुरक्षा नाही.. ही तर उघड दडपशाही ! मोदी-शहा-फडणवीस सरकारसे संविधान बचाव,संविधान बचाव !! अशा तीव्र संतप्त घोषणांच्या गजरात आज लोकमान्य टिळक चौक, अलका टॉकीज, येथे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विविध पक्ष संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.त्यामध्ये सुमारे ५०० कार्यकर्ते-नेते आणि नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक २०२४ या नावाने एका कायद्याचा मसुदा विधानसभेसमोर ठेवला आहे. त्या कायद्याचे उद्दिष्ट शहरी नक्षलवादी संघटनांचा बिमोड करणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायद्याच्या मसुद्य़ातच्या प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. परंतु प्रत्यक्ष कायद्यात नक्षलवादाचा एका शब्दाने किंवा सूचकपणेदेखील उल्लेख नाही. उलट बेकायदेशीर कृत्य याची अत्यंत व्यापक अशी व्याख्या केल्याने, कोणतेही जनआंदोलन किंवा संघटना ही बेकायदेशीर ठरवून तिची सर्व मालमत्ता जप्त करणे, तिच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सहानुभूतीदारांनादेखील २ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.असे आक्षेप यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नोंदविले .
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौताम्याचा आजचा दिवस असल्याने सर्वप्रथम या हुताम्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या नावाच्या आणि कार्याच्या घोषणा देण्यात आल्या.
या विधेयकाच्या विरोधात झालेल्या या निदर्शनांच्या कार्यक्रमात आज ऱाष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार,) शिवसेना(उबाठा),मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी,सुराज्य संघर्ष समिती, जबाब दो आंदोलन, अंगमेहनती संघर्ष समिती, क्रांतिकारी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, नव समाजवादी पर्याय, सिटू इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेथे झालेल्या सभेत मोहन जोशी,अभय छाजेड (काँग्रेस), प्रशांत जगताप, विकास लवांडे,(राष्ट्रवादी काँग्रेस(शप), रेखा मुंडे, गजानन थऱकुडे (शिवसेना (उबाठा), अजित अभ्यंकर (माकप), सिद्धार्थ धेंडे (रिपब्लिकन पार्टी आय्)दत्ता पाकिरे (समाजवादी पार्टी), विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे (आम आदमी पार्टी )सुरेश खोपडे(निवृत्त पोलीस अधिकारी),सारंग यादवाडकर(पर्यावरण तज्ञ),अब्राहम आढाव(माहिती अधिकार समूह), परमेश्वर जाधव(क्रांतिकारी कामगार पक्ष) दत्ता गायकवाड (रिपाई युवामोर्चा) इत्यादी नेत्यांनी आपले विचार मांडले. ऍडव्होकेट संदीप ताम्हनकर यांनी सूत्रसंचालन केले.
“मोदी-शहा-फडणवीस यांनी देशात आणू घातलेल्या धार्मिक द्वेषावर आधारित राजवटीच्या विरोधात जनतेचा असंतोष व्यक्त होऊ नये, यासाठी लोकांचा आवाज, त्यांना नक्षलवादी ठरवून दाबण्याचे हा कारस्थान उधळून लावले पाहिजे. जोपर्यंत सरकार हे विधेयक संपूर्णतः मागे घेत नाही, तो पर्यंत हे आंदोलन तीव्रपणे असेच चालू राहिल” असे विचार सर्व वक्त्यांनी मांडले. तसेच सरकारच्या या भीषण दडपशाहीची आणि अन्यायाची कित्येक उदाहरणे वक्त्यांनी दिली.हे आंदोलन हे विधेयक मागे घेईपर्यंत चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.