महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,भारत सरकार, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय लोकोत्सवाचा समारोप

पुणे (दि. २३ मार्च २०२५) लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र व ओरिसा मधील आदिवासी लोक संस्कृतीचा कलाविष्कार पाहण्याची संधी मिळाली. हा ठेवा अनुभवणे म्हणजे सामाजिक परंपरा, संस्कृतीचे जतन करणे देशाच्या ऐक्यासाठी नितांत गरजेचे आहे हे स्पष्ट झाले. यासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशने समन्वयाची भूमिका महत्त्वाची होती, असे मत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओरिसा राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सवाचा शनिवारी (२२ मार्च) प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे समारोप झाला. या लोकोत्सवाचे संयोजन पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनने केले केले होते. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या पुणे विभागीय अधिक्षक जान्हवी जानकर, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे, मलाप्पा कस्तुरे आदी उपस्थित होते.

समारोप समारंभात मुंबई येथील रूद्राक्ष कला विष्कारच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र सोहळा संस्कृतीचा’ यामध्ये गण, गवळण, लावणी, वासुदेव, गोंधळ, शेतकरी नृत्य, पोतराज, कोळी नृत्य असे विविध प्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली. नृत्य दिग्दर्शन उमेश देसाई व राजेश शिर्के आणि सूत्रसंचालन संतोष पेटकर यांनी केले. त्यानंतर ओरिसा येथील कौशल फोक ग्रुप मधील कलाकारांनी थापा नृत्य, दालखाई नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी उमेश देसाई, नवगंध दास आणि कलाकारांचा आ. उमा खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन चिंचवडे, सुनील पोटे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अभिजित कोळपकर यांनी केले. आभार अविनाश आवटे यांनी मानले.
