पुणे-मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याची माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी समाज माध्यमातून दिली आहे . त्यांनी याअसे म्हटले आहे कि,’
शिवस्नुषा श्री छत्रपती महाराणी ताराबाई साहेब यांच्या समाधी स्थळाची झालेली दुरवस्था अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पराक्रम आणि धैर्याचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई महाराणींची स्मृती कायम राखणे, ही आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे.
याच भावनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. महाराणी ताराराणी साहेबांच्या समाधीचे त्वरित संवर्धन आणि जिर्णोद्धार करण्यात यावा, अशी सर्व शिवभक्तांच्या वतीने मागणी केली आहे.
मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार महाराणी ताराबाई साहेबांच्या गौरवशाली स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या समाधीस्थळाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करेल.
