पुणे-शिवपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराजांच्या ३२५ व्या पुण्यतिथी निमित्त आज सिंहगड येथे महाराजांच्या समाधीस युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अभिवादन केले.आणि त्यांनी यावेळी छत्रपती राजाराम महाराज सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. आमदार भीमराव तापकीर, वारकरी मंडळी, राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आदी प्रशासकीय अधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी असे म्हटले कि,’ श्री राजाराम छत्रपती महाराजांनी १६८९ ते १७०० या अकरा वर्षांत अत्यंत निकराने औरंगजेबापासून स्वराज्याचे रक्षण केले. तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर आठ वर्षे राजधानी हलवून स्वराज्याचे अस्तित्व जिवंत ठेवले व आपल्या राजनीती कौशल्याने मुघल सेनेला दुर्बल बनविले. आपल्या हयातीत दिल्ली जिंकून श्री शिवछत्रपती महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय श्री राजाराम महाराजांनी बाळगले होते, मात्र १७०० साली वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी महाराजांचे सिंहगड मुक्कामी अकाली निधन झाले. याचठिकाणी महाराजांची समाधी आहे.
गडावरील या समाधीस्थळी छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी सोहळा समिती, सिंहगड यांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात सहभागी झालो. भारतीय सैन्य दलाची महार रेजिमेंट पाईप बँड पथक व पुणे ग्रामीण पोलीस बँड पथक यांच्या वतीने श्री राजाराम छत्रपती महाराजांस मानवंदना देण्यात आली. तसेच पुणे पोलिसांच्या वतीने बंदुकांच्या तीन फैरी झाडून महाराजांस मानवंदना देण्यात आली. वारकरी मंडळींनी टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांस अभिवादन केले.