पुणे- :- शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रोपवे प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी शिवनेरी, लेण्याद्री, भीमाशंकर आदी ठिकाणी उभारण्याची मागणी रोपवे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यास ‘पर्वतमाला योजनेंतर्गत” रोपवे बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवनेरीसह विविध रोपवेचे प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने परिशिष्ट-अ नुसार पुणे जिल्ह्यातील श्री निमगाव खंडोबा, सिंहगड व जेजुरीसह एकूण १६ आणि परिशिष्ट-ब नुसार शिवनेरी किल्ला, अष्टविनायक लेण्याद्री, भीमाशंकर ज्योतिर्लिंग व दाऱ्याघाट यासह एकूण २९ ठिकाणी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला होता.
राज्यातील विविध ठिकाणी रोपवे बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. आणि राज्य सरकार यांच्यात ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार राज्य पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास अर्थकारणाला गती मिळेल, असेही कोल्हे म्हणाले .
सरकारने रोपवे बांधण्यासाठी जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग देणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाने पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभागासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवनेरी, लेण्याद्रीसह राज्यातील सर्वच रोपवे बांधण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
रोपवे प्रकल्पांबरोबरच राज्य शासनाने शिवनेरी, अष्टविनायक गणपती देवस्थान, वढु-तुळापूरचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक यांना जोडणारा ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ रस्ते प्रकल्पही हाती घ्यावा यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने रोपवे प्रकल्पाला गती देतानाच ‘शिव-शंभू कॉरिडॉर’लाही मंजुरी द्यावी.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार
शिवनेरी, लेण्याद्रीसह चार ठिकाणी रोपवे प्रकल्प साकारणार…
Date: